प्रेम, जिव्हाळा आणि त्यागाची कहाणी; ‘बंधू’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित
गीतकार गुरु ठाकूर यांच्या शब्दांतून व्यक्त झालेलं ‘भाऊ काय, बंधू काय… जणू दूध आणि साय!’ हे नातं ट्रेलरमधून उलगडताना दिसतं. उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी यांच्या दमदार अभिनयाची झलक असलेला हा ट्रेलर दोन भावांमधील प्रेम, मतभेद आणि भावनिक गुंतागुंत दाखवतो. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच सोशल मीडियावर त्याला जोरदार प्रतिसाद मिळाला असून, तो ट्रेंडिंगमध्येही आला आहे.
रजत बेदी प्रस्तुत, जे एस् डी स्टुडिओ आणि ट्राईफ्लिक्स एंटरटेनमेंट यांच्या सहकार्याने हा चित्रपट साकारला आहे. प्रणव देसाई, जुही देसाई आणि कुलदीप सुनील ओझा यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. लेखन, संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी नितीन सिंधूविजय सुपेकर यांनी सांभाळली आहे.
‘आटपाडी नाईट्स’ आणि ‘सरला एक कोटी’ या चित्रपटांनंतर नितीन सुपेकर पुन्हा एकदा मानवी नात्यांच्या भावविश्वाचा वेध घेणारी कथा घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहेत. उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी यांच्यासोबत मिताली जगताप आणि मृण्मयी देशपांडे महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत. रेणुका दफ्तरदार, स्मिता तांबे, श्रीकांत यादव, विठ्ठल काळे, यशपाल सरणात, ज्ञानरत्न अहिवळे, चैतन्य सोलणकर, श्रीपाद पानसे यांच्यासह अनेक कलाकार या चित्रपटात आहेत.
चित्रपटातील गीतांना गुरु ठाकूर आणि वैभव देशमुख यांनी शब्दबद्ध केले असून, विजय नारायण गवंडे यांनी संगीत दिले आहे. अजय गोगावले, अतुल गोगावले, अमिता घुगरी आणि शमिका भिडे यांच्या आवाजाने गाण्यांना सुरेल साथ लाभली आहे. गाण्यांचे संगीत हक्क झी म्युझिककडे आहेत.
‘बंधू’च्या ट्रेलर लाँच सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार रामदास आठवले यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. त्यांनी ट्रेलरचे कौतुक करत संपूर्ण टीमला चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या. प्रेम, जिव्हाळा आणि त्यागाची जाणीव करून देणारा ‘बंधू’ हा चित्रपट २० नोव्हेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
Ans: ‘बंधू’ हा मराठी चित्रपट २० नोव्हेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
Ans: उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी दोन भावांच्या प्रमुख भूमिका साकारत आहेत. त्यांच्या सहचारिणींच्या भूमिकेत मिताली जगताप आणि मृण्मयी देशपांडे दिसणार आहेत.
Ans: या चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन नितीन सिंधूविजय सुपेकर यांनी केले आहे.






