( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
शिक्षण व्यवस्थेतील वास्तव, तरुणाईचा संघर्ष आणि आयुष्याकडे नव्या दृष्टीने पाहण्याचा संदेश देणारा आगामी मराठी चित्रपट ‘आऊट ऑफ सिलॅबस – पुस्तकांच्या पलीकडे’ प्रदर्शनापूर्वीच चर्चेचा विषय ठरला आहे. नुकत्याच पार पडलेल्या चित्रपटाच्या भव्य प्रीमियर सोहळ्याला चित्रपटसृष्टी, राजकारण, उद्योग, समाजकारण आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावत चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.
Adu-Tishu Production & Music प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती सामाजिक कार्यकर्ते आणि चित्रपट निर्माते डॉ. सुगत ग्यानेश्वर वाघमारे यांनी केली आहे. आमदार डॉ. संजय कुटे हे चित्रपटाचे सहनिर्माते असून, दिग्दर्शनाची धुरा नवीन देशबोनिया यांनी सांभाळली आहे. चित्रपटाची कथा आणि पटकथा अनिकेत रामचंद्र कोरडे यांनी लिहिली असून, संकलन अनिल विठ्ठल थोरात यांनी केले आहे.
प्रीमियर सोहळ्यात चित्रपटातील प्रमुख कलाकार अजिंक्य राऊत, अद्वयी वाघमारे, शेषपाल गनवीर, अभिजीत रामचंद्र आणि सानिका थोरसकर यांनी उपस्थित राहून चित्रपटाच्या निर्मितीमागील अनुभव आणि भूमिका प्रेक्षकांसमोर मांडल्या. त्यांच्या संवादाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या विशेष सोहळ्याला National Stock Exchangeचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्यासोबत आमदार संजय कुटे, रणधीर सावरकर, हरीश पिंपळे, नारायण कुचे, किसन वानखडे, वसंत खंडेलवाल, हेमंत पाटील आणि श्वेता महाले यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
चित्रपटाच्या कथानकातून केवळ पुस्तकांपुरते मर्यादित न राहता जीवनातील वास्तव, मूल्ये आणि सामाजिक जबाबदारी यांचा वेध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे हा चित्रपट विशेषतः तरुण पिढीशी नाळ जोडणारा ठरेल, असा विश्वास चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला.
प्रीमियरला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि उपस्थित मान्यवरांकडून मिळालेल्या शुभेच्छांमुळे ‘आऊट ऑफ सिलॅबस – पुस्तकांच्या पलीकडे’ या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली असून, प्रदर्शनानंतरही हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






