(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Santosh Davakhar: मराठी सिनेसृष्टीसाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. संतोष डावखर दिग्दर्शित ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची 99व्या अकादमी पुरस्कारांसाठी म्हणजेच ऑस्कर 2027 साठी भारताची अधिकृत एन्ट्री म्हणून निवड झाली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने 18 सप्टेंबर रोजी ही घोषणा केली. देशभरातून आलेल्या 33 चित्रपटांमधून ‘गोंधळ’ची ‘बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म’ या श्रेणीसाठी निवड करण्यात आली.
संतोष डावखर यांनी फिल्ममेकर म्हणून ओळख निर्माण करण्यापूर्वी वेगवेगळ्या क्षेत्रांत काम केलं आहे. त्यांच्या अधिकृत वेबसाइट ‘डावखर फिल्म्स’नुसार, ते प्रोजेक्ट कन्सल्टंट आणि सोशल अॅक्टिव्हिस्ट म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात प्राध्यापक म्हणून झाली.
सिनेमाच्या क्षेत्रात येण्यापूर्वी विविध अनुभव घेतल्यानंतर त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) येथे स्क्रीनप्ले रायटिंगचा शॉर्ट कोर्स केला. यानंतर सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवर आधारित चित्रपट आणि लघुपटांच्या माध्यमातून त्यांनी सिनेमाच्या क्षेत्रात काम सुरू केलं.
संतोष डावखर यांच्या सुरुवातीच्या लघुपटांपैकी ‘अज्ञात’ हा सामाजिक विषयाला हात घालणारा प्रकल्प होता. या लघुपटातून वर्गभेदाचा विषय मांडण्यात आला होता. ‘अज्ञात’ची आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये निवड झाली आणि या लघुपटाला विविध पुरस्कारही मिळाले.
याशिवाय डावखर यांनी कॅशलेस इकॉनॉमीशी संबंधित सरकारी जाहिरातीचं दिग्दर्शनही केलं आहे.
कान्समधील अनुभवाचा ‘गोंधळ’वर परिणाम
आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि महोत्सवांशी आलेल्या संपर्कामुळे संतोष डावखर यांची सिनेमाविषयीची आवड आणखी वाढली. विशेषतः कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये घालवलेल्या वेळेचा ‘गोंधळ’च्या निर्मितीवर मोठा प्रभाव पडल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
ANIशी बोलताना डावखर यांनी कान्समध्ये असताना दररोज अनेक चित्रपट पाहत असल्याचं सांगितलं. या अनुभवातून आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातूनही पाहता येईल असा सिनेमा बनवण्याची प्रेरणा मिळाल्याचं त्यांनी नमूद केलं.
‘गोंधळ’ बनवण्यामागचा विचार सांगताना संतोष डावखर यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पाहिलेल्या सिनेमांचा प्रभाव असल्याचं सांगितलं. भारतातील संस्कृती आणि वारसा आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसमोर मांडणारी कथा तयार करण्याची त्यांची इच्छा होती.
33 चित्रपटांमधून ‘गोंधळ’ची ऑस्करसाठी निवड
फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने 99व्या अकादमी पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत एन्ट्री म्हणून ‘गोंधळ’ची निवड केली आहे. यंदा एकूण 33 चित्रपट ऑस्करच्या निवड प्रक्रियेसाठी पाठवण्यात आले होते.
यामध्ये सर्वाधिक 14 हिंदी चित्रपट होते. मराठी, तेलुगू आणि गुजराती भाषेतील प्रत्येकी चार चित्रपटांचा समावेश होता. त्याशिवाय तीन तमिळ, एक मल्याळम आणि एक नागामीज चित्रपटही निवड प्रक्रियेत होते. विशेष म्हणजे या यादीत एका मूक चित्रपटाचाही समावेश होता.
आता ‘गोंधळ’च्या माध्यमातून संतोष डावखर यांचा सिनेमा आंतरराष्ट्रीय पातळीवर किती पुढे जातो, याकडे मराठी सिनेसृष्टीसह चित्रपटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.






