फोटो सौजन्य - Social Media
Zee Studios निर्मित ‘तुंबाडची मंजुळा’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. टीझरमध्ये दिसलेलं रहस्यमय आणि हटके गाव प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरलं आहे. या पार्श्वभूमीवर आता चित्रपटातील ‘असं वेगळं गाव’ हे पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलं असून, ते प्रेक्षकांना एका अनोख्या गावाच्या दुनियेत घेऊन जात आहे.
या गाण्याचं खास आकर्षण म्हणजे शास्त्रीय आणि सुगम संगीतातील प्रसिद्ध गायक Rahul Deshpande आणि गोड आवाजासाठी ओळखली जाणारी Arya Ambekar यांची सुरेल साथ. या दोघांनी पहिल्यांदाच एकत्र गाणं सादर केल्याने संगीतप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. त्यांच्या आवाजातील भावपूर्णता, सहजता आणि नजाकत गाण्याला वेगळीच उंची देत असून, गाणं ऐकताना प्रेक्षक त्या गावाच्या वातावरणात हरवून जातात.
या गाण्याबद्दल बोलताना राहुल देशपांडे म्हणाले की, “या चित्रपटातील हे गाणं खूप फ्रेश आणि वेगळ्या धाटणीचं आहे. आधुनिक संगीतासोबतच यात गावाकडचा गंध सुंदरपणे जपण्यात आला आहे. शब्द आणि चाल दोन्ही आजच्या काळाशी सुसंगत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना हे गाणं नक्कीच आवडेल.” तर आर्या आंबेकरनेही आपल्या भावना व्यक्त करत सांगितलं की, “हे गाणं एका गावाची सुंदर आणि भावनिक गोष्ट सांगतं. अशा प्रकारचं गाणं मी पहिल्यांदाच गात असून, चित्रपटात हे गाणं पाहताना प्रेक्षकांना त्याची वेगळेपणाची जाणीव होईल.”
‘असं वेगळं गाव’ हे गाणं गावकऱ्यांच्या अतरंगी, सतरंगी आणि मनमोकळ्या स्वभावाचं जिवंत चित्र उभं करतं. एकमेकांशी जिव्हाळ्याने जोडलेली माणसं, त्यांच्या नात्यांतील ऊब, आनंद आणि मस्ती या सगळ्यांचा सुरेल संगम या गाण्यातून अनुभवायला मिळतो. कोकणातील निसर्गरम्य लोकेशन्सवर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यात हिरवाई, साधेपणा आणि गावाकडच्या जीवनाचं सौंदर्य अत्यंत प्रभावीपणे टिपण्यात आलं आहे.
या गाण्याचे शब्द विक्रम एडके यांनी लिहिले असून असीम कुऱ्हेकर, प्रतीक केळकर आणि तेजस जोशी या संगीतकार त्रयींनी ते संगीतबद्ध केलं आहे. चित्रपटाच्या एकूण भावविश्वाला दिशा देणारं हे गाणं असल्याचं निर्मात्यांकडून सांगण्यात येत आहे. Bavesh Janavlekar यांनीही या गाण्याचं कौतुक करत म्हटलं की, “हे गाणं चित्रपटाचा सूर निश्चित करतं. कोकणातील गावावर आधारित असलं तरी प्रत्येक प्रेक्षकाला ते आपल्या मातीशी जोडणारं वाटेल.”
या चित्रपटाचं लेखन Rishikesh Turai यांनी केलं असून दिग्दर्शन Vaibhav Korgaonkar यांनी केलं आहे. चित्रपटात Jitendra Joshi, Sai Tamhankar, Om Bhutkar, Makarand Anaspure, Anshuman Vichare, Usha Nadkarni यांसारखे दिग्गज कलाकार झळकणार आहेत. ‘तुंबाडची मंजुळा’ हा चित्रपट येत्या ५ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्यातील हे गाणं आधीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.






