PCMC News: नवी सांगवी आणि पिंपळे गुरवमधील अनधिकृत बांधकामांविरुद्ध महापालिकेचा हातोडा; २ हजार चौ.मी.चे बांधकाम जमीनदोस्त
PCMC News: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात मोठी मोहीम उघडण्यात आली आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या आदेशानुसार, बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने पिंपळे गुरव आणि नवी सांगवी भागातील सुमारे २ हजार चौरस मीटरहून अधिक अनधिकृत आरसीसी बांधकामांवर निष्कासनाची कारवाई केली.
‘ड’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पिंपळे गुरव येथील ५३० चौ.मी. आणि ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत नवी सांगवी परिसरातील १ हजार ५४५ चौ.मी. अनधिकृत आरसीसी बांधकामे पाडण्यात आली.मागील आठवड्यात आयुक्तांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या कारवाईचा आढावा घेतला होता. शहरातील अतिक्रमणे आणि नियमबाह्य बांधकामे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाहीत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले होते. अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. यामध्ये आरसीसी बांधकामांसोबतच इतर लहान-मोठी नियमबाह्य बांधकामे देखील हटवण्यात आली आहेत.
ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत क्षेत्रीय अधिकारी पूजा दुधनाळे यांच्या नेतृत्वात वार्ड क्र. २९, पिंपळे गुरव येथील गणेशनगर, साईनाथनगर, लक्ष्मीनगर परिसरातील एकूण ५३० चौ.मी. आरसीसी बांधकामांवर निष्कासन कारवाई करण्यात आली. या कारवाईवेळी उपअभियंता शाम गर्जे, बीट निरीक्षक विक्रम चव्हाण, राहुल निकम, उमेश लोंढे, ओंकार देशमुख, पूजा राठोड तसेच १३ एमएसएफ जवान, ७ मजूर, २ पोलीस, २ ट्रॅक्टर ब्रेकर आणि १ जेसीबी सहभागी होते.
ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत वार्ड क्र. ३१ मधील नेताजी नगर, गांगर्डे नगर, विनायक नगर, गजानन नगर या भागात क्षेत्रीय अधिकारी पूजा दुधनाळे यांच्या नेतृत्वात एकूण १ हजार ५४५ चौ.मी. आरसीसी बांधकामांवर निष्कासन कारवाई करण्यात आली. या धडक कारवाईत उपअभियंता प्रताप मोरे, कनिष्ठ अभियंता जयवंत रोकडे, बीट निरीक्षक शाबोद्दिन बागबान, रोहन कांबळे, प्रफुल्ल भोकरे, सुरज माने तसेच १८ एमएसएफ जवान, १० मजूर, २ ट्रॅक्टर ब्रेकर आणि १ जेसीबी यांच्या सहाय्याने ही कारवाई पार पडली.
महापालिकेच्या पथकाने केलेल्या तपासणीत विविध ठिकाणी विनापरवानगी आरसीसी बांधकामे, शेड तसेच इतर स्वरूपाची अनधिकृत वाढ आढळून आली. त्यानुसार संबंधितांवर कारवाई करत सुमारे काही हजार चौरस फूट क्षेत्रफळातील बांधकामे हटविण्यात आली.
पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्यात यावी. या कारवाईचा नियमित आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी सातत्याने पाहणी करावी. रस्त्यावर स्टॉल लावणाऱ्या फेरीवाल्यांवर देखील कारवाई करण्यात यावी. नागरिकांच्या सुरक्षेच्या तसेच शहराच्या नियोजनबद्ध विकासाच्या दृष्टीने ही कारवाई अधिक प्रभावीपणे राबविण्यात यावी. नागरिकांनीही नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.
डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका






