संग्रहित फोटो
पुणे/गायत्री पवळे : एकेकाळी “ज्येष्ठांचीच दुनिया” अशी ओळख असलेल्या पुणे शहरातील सांस्कृतिक संस्थांमध्ये आता नव्या पिढीचा सहभाग झपाट्याने वाढताना दिसत आहे. शास्त्रीय संगीत, नाटक, लोककला, वारसा-भ्रमंती, कार्यशाळा आणि स्वयंसेवक उपक्रमांच्या माध्यमातून तरुणाई केवळ प्रेक्षक म्हणून नव्हे, तर आयोजक, समन्वयक आणि सर्जनशील सहकारी म्हणूनही पुढे येत आहेत. शहरातील नामांकित शाळा आणि महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनातही तरुणांचा सक्रिय सहभाग दिसून येत आहे. कला थेट लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न, तरुणांसाठी खुल्या कार्यशाळा आणि स्वयंसेवी चळवळी यामुळे हा बदल अधिक ठळक झाला आहे.
विद्यार्थ्यांनाही कलेचा प्रत्यक्ष अनुभव
गेल्या काही वर्षांत “फक्त कार्यक्रम” या चौकटीपलीकडे जाऊन “अनुभवाधारित सहभाग” वाढला आहे. कलाकारांशी संवाद, रंगमंचामागील काम, व्यवस्थापन, सोशल मीडिया प्रसिद्धी, तिकीटव्यवस्था, डिझाइन आणि डॉक्युमेंटेशन अशा विविध स्तरांवर तरुणांची उपस्थिती वाढली आहे. त्यामुळे सांस्कृतिक संस्था अधिक जिवंत, संवादक्षम आणि काळानुरूप होत असल्याचे दिसते. पुणे जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीत आणि नृत्याची ओळख करून देण्यासाठी सुरू केलेल्या उपक्रमांमुळे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांनाही कलेचा प्रत्यक्ष अनुभव मिळत आहे. तसेच महाविद्यालयीन युवा महोत्सव, नाट्य कार्यशाळा आणि स्वयंसेवी गट तरुणांसाठी प्रवेशद्वार ठरत आहेत.
कला ही संवादाचे प्रभावी माध्यम बनतेय
काही रंगकर्मी आणि प्रशिक्षण संस्थांनी अभिनय, इम्प्रोव्हायझेशन, संवादकला आणि व्यक्तिमत्त्व विकास यांना एकत्रित करत कार्यक्रम आखल्याने कला ही करिअर, अभिव्यक्ती आणि सामाजिक संवादाचे प्रभावी माध्यम बनत आहे. ऑनलाइन नोंदणी, सोशल मीडिया आणि डिजिटल प्रचारामुळे तरुण प्रेक्षकांपर्यंत पोहोचणेही सोपे झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, नव्या पिढीला केवळ परंपरेचा उपदेश नको, तर सहभाग, प्रयोग आणि स्वतःची अभिव्यक्ती हवी आहे. त्यामुळे सांस्कृतिक संस्थांनीही कार्यक्रमांचे स्वरूप बदलत शास्त्रीयता, संवाद आणि अनुभव यांचा समन्वय साधण्यास सुरुवात केली आहे.
“पुण्यातील अनेक सांस्कृतिक संस्था शतकाहून जुनी परंपरा जपत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. मात्र या परंपरेला नव्या पिढीची जोड देणे तितकेच आवश्यक आहे. शिक्षणासाठी पुण्यात येणाऱ्या तरुणांमध्ये सांस्कृतिक क्षेत्रात काम करण्याची प्रचंड इच्छा आहे. या ऊर्जेला योग्य दिशा मिळाल्यास पुण्याचे सांस्कृतिक विश्व अधिक समृद्ध होईल,” – जगदीश बामणे (विद्यार्थी, फर्ग्युसन महाविद्यालय)






