( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Tiffany Trump: अंबानी कुटुंबीयांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश चतुर्थीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. या सोहळ्याला देशातील विविध क्षेत्रांतील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी हजेरी लावली. विशेष म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी टिफनी ट्रम्पही पती मायकेल बुलोससोबत अंबानी कुटुंबीयांच्या गणेशोत्सवात सहभागी झाली. टिफनीचा पारंपरिक भारतीय लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
अंबानी कुटुंबीयांच्या गणपती उत्सवात टिफनी ट्रम्पने पारंपरिक भारतीय पोशाख परिधान केला होता. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केलेला पेस्टल ग्रीन रंगाचा लेहंगा तिने परिधान केला होता.
या लेहंग्यावर आयव्हरी रंगाची नाजूक एम्ब्रॉयडरी आणि मोत्यांचं सुंदर काम करण्यात आलं होतं. या पारंपरिक लूकमध्ये टिफनी अतिशय आकर्षक दिसत होती. तिच्यासोबत पती मायकेल बुलोसही या सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यांनी केशरी रंगाची शेरवानी परिधान केली होती.
‘प्रेमासह भारतात’
अंबानींच्या गणपती उत्सवातील काही फोटो टिफनी ट्रम्पने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोंसोबत तिने ‘With love in India’ असं कॅप्शन लिहिलं आहे. भारतातील संस्कृती आणि तिला मिळालेल्या प्रेमाने टिफनी प्रभावित झाल्याचं तिच्या पोस्टमधून दिसून येतं.
टिफनी आणि मायकेल बुलोस हे अँटिलियामध्ये आयोजित करण्यात आलेल्या अंबानी कुटुंबीयांच्या गणेश चतुर्थी सोहळ्यात सहभागी झाले होते. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
टिफनी ट्रम्प केवळ गणपतीच्या स्वागतासाठीच नाही, तर अंबानी कुटुंबीयांच्या गणपती विसर्जन सोहळ्यातही सहभागी झाली. अंबानी कुटुंबातील सदस्यांसोबत टिफनीने बाप्पाला निरोप दिला.
भारताच्या पारंपरिक संस्कृतीशी जोडलेला टिफनीचा हा अंदाज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. गणपती उत्सवापासून विसर्जनापर्यंत टिफनीने भारतीय परंपरेत सहभागी होत उपस्थितांचीही दाद मिळवली.






