(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)
Ayushmann Khurrana: बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना आणि अभिनेत्री सारा अली खान यांचा आगामी ‘उडता तीर’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच त्याला मोठा धक्का बसला आहे. नेपाळमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी नाकारण्यात आली असून, त्याचे प्रदर्शन थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचे चित्रण हे या निर्णयामागील प्रमुख कारण असल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळच्या माहिती आणि संचार मंत्रालयाने (MIN) चित्रपट वितरण कंपनी नॅशनल सिने ग्रुपला चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी नाकारल्याचे कळवले आहे. आकाश कौशिक दिग्दर्शित हा चित्रपट शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र, मंत्रालयाच्या ऑडिओ-व्हिडिओ आणि टेलिकास्ट शाखेने चित्रपटाची सामग्री निर्मिती, प्रदर्शन आणि वितरण कायदा, २०२६ मधील कलम ८(३) अंतर्गत प्रतिबंधित असल्याचे म्हटले आहे. या तरतुदीनुसार, संबंधित चित्रपटाला सार्वजनिक प्रदर्शनाची परवानगी देता येत नाही.
काय आहे ‘उडता तीर’चे पाकिस्तान कनेक्शन?
‘उडता तीर’ हा करण जोहरच्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली तयार झालेला स्पाय थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराना, सारा अली खान, गुलशन ग्रोव्हर आणि राम कपूर यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
चित्रपटाची कथा एका पाकिस्तानी एजंटभोवती फिरते. हा एजंट भारतात दाखल झाल्यानंतर एका अपघातात त्याची स्मरणशक्ती गमावतो. त्यानंतर त्याचा भारताशी जिव्हाळा निर्माण होतो आणि तो भारताच्या बाजूने उभा राहून पाकिस्तानमधील दहशतवादी आणि गुप्तहेरांना पकडण्याच्या मोहिमेत सहभागी होतो, अशी या चित्रपटाची कथावस्तू आहे.
समोर आलेल्या वृत्तांनुसार, चित्रपटात भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचे विकृत चित्रण करण्यात आल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर चित्रपटाच्या सार्वजनिक प्रदर्शनावर बंदी घालण्यात आल्याचे सांगितले जात आहे. नेपाळमध्ये एखाद्या देशाच्या किंवा तेथील समुदायाच्या राष्ट्रीयत्वावर थेट परिणाम करणाऱ्या चित्रपटांच्या प्रदर्शनावर निर्बंध घालण्याची तरतूद असल्याचेही वृत्त आहे.
दरम्यान, ‘उडता तीर’च्या प्रदर्शनाबाबत नेपाळमध्ये घेतलेल्या या निर्णयामुळे चित्रपटाच्या चर्चेला नवे वळण मिळाले आहे. मात्र, या निर्णयासंदर्भातील अधिकृत स्पष्टीकरण आणि चित्रपटाच्या निर्मात्यांची प्रतिक्रिया याबाबतची माहिती समोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे.






