काही वर्षात 100 कोटी तरुण होणार बहिरे? WHO चा भीतीदायक अहवाल (फोटो सौजन्य-ट्विटर)
आजकाल बहुतेक लोक आजूबाजूचा आवाज टाळण्यासाठी किंवा फॅशनेबल दिसण्यासाठी हेडफोन (headphones) वापरतात. ऑफिसला किंवा कॉलेजला जाताना, प्रवास करताना, किंवा एखादं काम करतानाही हेडफोन किंवा इअरफोन हा प्रत्येक व्यक्तीचा सोबती असतो. हेडफोन कानावर लावल्याने बाह्य आवाजापासून संरक्षण होते, हे जरी खरं असलं तरी त्याचा अतिवापर आपल्या कानांसाठी अतिशय हानिकारक ठरू शकते हे देखील प्रत्येकाला माहित असणार…याचपार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात असे म्हटले आहे की, येत्या काळात जगभरात 100 कोटींहून अधिक लोक बहिरे होऊ शकतात आणि यामागे कोणतेही महामारी नसून लोकांचा एक छंदचं कारणीभूत ठरु शकतो.
डब्ल्यूएचओच्या मेक हिअरिंग सेफ मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असा अंदाज आहे की, 2050 पर्यंत जगभरात 100 कोटींहून अधिक तरुण बहिरे होऊ शकतात. या तरुणांचे वयही 12 ते 35 वर्षांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. आपल्या वाईट ऐकण्याच्या सवयींमुळे असे घडेल असे मार्गदर्शक तत्त्वे सांगतात.
सध्या 12 ते 35 वर्षे वयोगटातील सुमारे 50 कोटी लोक विविध कारणांमुळे ऐकू येणे किंवा बहिरेपणाच्या समस्येने त्रस्त आहेत. यापैकी २५ टक्के लोक असे आहेत ज्यांना इअरफोन, इअरबड्स, हेडफोन्स यांसारख्या वैयक्तिक उपकरणांवर मोठ्या आवाजात ऐकत असतात. तर सुमारे 50 टक्के लोक असे आहेत जे मनोरंजनाची ठिकाणे, क्लब, डिस्कोथेक, सिनेमा, फिटनेस क्लास, बार किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात ऐकत असतात. अशा परिस्थितीत मोठ्या आवाजात संगीत ऐकण्याचा किंवा कानातली उपकरणे जास्त वापरण्याचा छंद तुम्हाला बहिरे बनवू शकतो.
सामान्यतः वैयक्तिक उपकरणांमध्ये आवाजाची पातळी 75 डेसिबल ते 136 डेसिबल पर्यंत असते. त्याची कमाल पातळी वेगवेगळ्या देशांमध्ये भिन्न असू शकते. दरम्यान वापरकर्त्यांनी त्यांच्या उपकरणांचा आवाज 75 dB ते 105 dB दरम्यान ठेवावा आणि ते मर्यादित काळासाठी वापरावे. जर याची क्षमता वाढवली तर कानाला धोका निर्माण होऊ शकतो. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नवी दिल्ली येथील ईएनटीचे प्राध्यापक डॉ. बी.पी. शर्मा सांगतात की, उपकरणांमध्ये येणारा आवाजही खूप जास्त आहे. कानांसाठी सर्वात सुरक्षित आवाज 20 ते 30 डेसिबल आहे. जास्त आवाजाच्या सतत संपर्कात राहिल्याने कानांच्या संवेदी पेशींचे नुकसान होते.