वायू प्रदूषणामुळे मुलांच्या मृत्यूत वाढ (फोटो प्रातिनिधिक आहे - सौजन्य - iStock)
स्टेट ऑफ ग्लोबल एअर (SoGA) 2024 च्या अहवालात धोकादायक माहिती समोर आली आहे. या अहवालात दिल्याप्रमाणे भारतामध्ये दरवर्षी वायू प्रदूषणामुळे दिवसाला 464 मुलांचा मृत्यू होतोय. अहवालात सांगण्यात आल्याप्रमाणे, PM2.5 नावाचे अत्यंत बारीक वायुकण, जे इतके सूक्ष्म आहेत की, सरळ फुफ्फुसांमध्ये जातात आणि त्यामुळे मुलांचा मृत्यू होतो. भारतामध्ये सध्या वायु प्रदूषणामुळे मुलांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे.
हे वायुकण हृदयरोग, स्ट्रोक, फुफ्फुसाचा कॅन्सर आणि श्वासाचे आजार यांना आमंत्रण देण्यास मदत करतात. वायू प्रदूषणामुळे ज्या मुलांचा मृत्यू होतोय त्यामध्ये 5 वर्षांपेक्षा कमी असणाऱ्या मुलांची संख्या जास्त असल्याचे आता समोर आले आहे.
मृत्यूचे सर्वात मोठे कारण

वायू प्रदूषण (फोटो सौजन्य – iStock)
शोधानुसार, वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत वाढ झाली असून तंबाखू आणि डायबिटीसने होणाऱ्या मृत्यूसंख्येलाही या कारणाने मागे सोडल्याचे दिसत आहे. मृत्यूच्या सर्वात मोठ्या कारणांपैकी वायू प्रदूषण हा घटक अधिक मोठा ठरताना दिसतोय. दरम्यान हाय ब्लड प्रेशर आणि वायू प्रदूषण या दोन्ही कारणांनी अधिक मृत्यू होत असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
या शहरांना अधिक धोका
अहवालानुसार, दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई आणि बेंगळुरूसारख्या शहरांमध्ये वायू प्रदूषणाची पातळी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) निर्धारित केलेल्या सुरक्षित मर्यादेपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे, त्यामुळे मुलांसाठी सर्वात धोकादायक शहरांमध्ये यांची नावे आहेत.
2021 मध्ये चारपैकी 1 मृत्यू भारतातील

मुलांच्या मृत्यूचे धक्कादायक प्रमाण (फोटो सौजन्य – iStock)
अहवालानुसार, वायू प्रदूषणाशी संबंधित रोग आणि विकारांमुळे 2021 मध्ये जगभरात 8.1 दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये चारपैकी एक मृत्यू भारतात होतो असे अहवालात सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्याची संख्या अधिक असल्याचे दिसून येतेय.
मुलांसाठी वायू प्रदूषण ठरतेय धोकादायक
UNICEF च्या सहकार्याने प्रथमच तयार करण्यात आलेल्या या अहवालानुसार पाच वर्षाखालील मुले विशेषत: असुरक्षित आहेत. अशी मुले जे जन्मतःच कमी वजनाची आहेत अथवा ज्या मुलांना दमा आणि फुफ्फुसाच्या आजारांचा त्रास आहे. अशा मुलांना अधिक जपण्याची गरज आहे.






