उत्तराखंडमध्ये हिमस्खलन! बर्फाखाली ५७ कामगार अडकले, माना खिंडीदरम्यान दुर्घटना
उत्तराखंडमधील चमोली येथे मोठी दुर्घटना घडली आहे. माना गावात हिमकडा तुटून ५७ कामगार बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यातील १० कामगारांना वाचवण्याच यश आलं आहे. मात्र ४७ कामगार अद्यापही बर्फाखाली गाडले गेले आहेत. उर्वरित ४७ जणांचा शोध सुरू आहे. अपघातानंतर प्रशासन आणि बीआरओ टीम घटनास्थळी रवाना झाली आहे. सध्या आयटीबीपी आणि गढवाल स्काउटची टीम बचाव कार्यात गुंतली आहे.
दुर्घटनेवेळी एका खासगी कंत्राटदाराचे कामगार मोठ्या संख्येने घटनास्थळी काम करत असल्याचं सांगण्यात येत आहे. हे सर्वजण बीआरओ कराराखाली काम करणाऱ्या कंत्राटदाराचे कामगार होते. हिमस्खलन झालं त्यावेळी सर्व कामगारांची पळापळ सुरू झाली आणि यात ५७ कामगार बर्फाखाली दबले आहेत. त्यापैकी काही जण पळून जाण्यात यशस्वी झाला.
चमोलीचे जिल्हा दंडाधिकारी संदीप तिवारी यांनी आयआरएस अधिकाऱ्यांना बचाव कार्य करण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या आहेत. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सांगितले की, माना गाव आणि माना खिंडीदरम्यान सीमा रस्ते संघटनेजवळ हिमस्खलन झाल्याची नोंद झाली आहे. लष्कराच्या हालचालींसाठी ५८ कामगार रस्त्यावरून बर्फ हटवण्याचं काम करत होते. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहाणी झाली नसल्याचं सांगण्यात येत आहे. लष्करासोबतच आयटीबीपी, एनडीआरएफ, एसडीआरएफच्या बचाव पथकांना घटनास्थळी पाठवण्यात आलं आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ट्विट करून या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितले आहे की अडकलेल्यापैकी १६ कामगारांना वाचवण्यात यश आलं आहे. ते म्हणाले, ‘चामोली जिल्ह्यातील माना गावाजवळ बीआरओकडून सुरू असलेल्या बांधकामादरम्यान अनेक कामगार हिमस्खलनाखाली दबल्याची दुःखद बातमी मिळाली. आयटीबीपी, बीआरओ आणि इतर बचाव पथकांकडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. सर्व कामगार बांधवांच्या सुरक्षेसाठी मी भगवान बद्री विशालकडे प्रार्थना करतो.
मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशातील अनेक भागात प्रचंड नुकसान झालं आहे. राज्यातील कुल्लू जिल्ह्यातून विनाशाचे धक्कादायक फोटो समोर आले आहेत. पावसाने येथे इतका कहर केला आहे की नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत.
आज (२८ फेब्रुवारी), हिमाचल प्रदेशातील कुल्लू आणि मंडी जिल्ह्यांमधूनही विनाशाची चित्र समोर आली आहेत. मंडी जिल्ह्यातील ओट भागात भूस्खलन झाल्यानंतर चंदीगड-मनाली राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे, तर कुल्लूमध्ये नाल्यांमधून वाहने वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. हिमाचल प्रदेशातील विविध भागातील हवामान लक्षात घेता, हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.