संग्रहित फोटो
रायबरेली : आताचा जमाना ऑनलाईनचा आहे. या जमान्यात गुन्हेगारदेखील ऑनलाईन शिकून गुन्हे करत आहे. आता असेच एक प्रकरण उत्तर प्रदेशातील रायबरेलीतून (Raebareli Currency Notes) समोर आले आहे. येथे काही बदमाशांनी युट्यूबवरील व्हिडिओची मदत घेऊन बनावट नोटा छापल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. या दोघांकडून पोलिसांनी 99 हजार 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
श्रावण महिन्यात जिल्ह्यातील लालगंज भागातील ऐहार गावात असलेल्या बलेश्वर शिव मंदिराबाहेर जत्रेचे आयोजन केले जाते. येथे शेकडो भाविक दर्शनासाठी आणि जत्रेला भेट देण्यासाठी येतात. काल पोलिसांना खबऱ्याकडून माहिती मिळाली होती की, जत्रेत दोन तरुण बनावट नोटा वापरण्याचा प्रयत्न करणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने दोन्ही तरुणांना जत्रेतून पकडले आणि त्यांच्याकडून 500 रुपयांच्या 99 बनावट नोटा जप्त केल्या.
पीयूष वर्मा आणि विशाल अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. हे दोघेही मित्र आहेत. ते यूट्यूबवरून बनावट नोटा बनवायला शिकले. दोघांनी प्रिंटर आणि स्कॅनरच्या मदतीने घरीच नोटा छापायला सुरुवात केली. दोघेही जत्रेत या नोटा चालवण्याच्या प्रयत्नात होते.