भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये तैनात असलेल्या महिला पोलिस प्रतिभा त्रिपाठी (Pratibha Tripathi) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. प्रतिभा त्रिपाठी या वैद्यकीय तपासणीनंतर इंदूरहून भोपाळला परतत असताना ही घटना घडली. विशेष म्हणजे, धावत्या कारमध्येच त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या भोपाळमधील महिला कक्षात तैनात असलेल्या पोलिस निरीक्षक प्रतिभा त्रिपाठी बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. 2020 मध्ये कोव्हिडच्या पहिल्या लाटेत कोरोनाचा त्यांना संसर्ग झाला होता. प्रतिभा यांनी कोरोनाविरोधातील लढाई जिंकली. पण त्या कोव्हिडनंतर सतत आजारी पडायच्या. त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रासही होता, ज्यामुळे सातत्याने त्यांची प्रकृती खालावत गेली. कोरोना काळात त्यांनी एका मुलाला जन्म दिला. मुलाला जन्म दिल्यानंतर त्या वैद्यकीय रजेवर होत्या.
ऑक्टोबर 2023 मध्येच त्या पुन्हा नोकरीवर रुजू झाल्या. अशातच शनिवारी पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना इंदूरला नेण्यात आले. तिथे वैद्यकीय तपासणीनंतर पती आणि मुलासह इंदूरहून भोपाळला परतत असताना सोनकच्छजवळ त्यांची प्रकृती खालावली. पतीने त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी प्रतिभा यांना मृत घोषित केले.