फोटो सौजन्य - Social Media
जिल्ह्यात बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर तयारी केल्याचा गाजावाजा केला होता. मात्र प्रत्यक्षात अनेक परीक्षा केंद्रांवर कॉपीचे प्रकार उघडकीस आल्याने कॉपीमुक्तीचा डोलाराच कोसळल्याची चर्चा सुरू झाली आहे. जिल्ह्यात विविध केंद्रांवर तब्बल ६३२ विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले असून सुमारे ४७ शिक्षक कारवाईच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तर्फे दहावी व बारावीच्या परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान घेतल्या जात आहेत. बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातून २२ हजार ३६९ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. कॉपी रोखण्यासाठी ७४ परीक्षा केंद्रांवरील ८३० वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. उपद्रवी केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी बैठे पथक व भरारी पथके नेमण्यात आली होती. तरीही इंग्रजी व मराठीच्या पेपरदरम्यान अनेक विद्यार्थी कॉपी करताना पकडले गेले.
दरम्यान, काही केंद्रांवर शिक्षकच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. काही उत्तरपत्रिकांवर वस्तुनिष्ठ प्रश्नांजवळ पेन किंवा पेन्सिलने खूणा केल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने २६ शिक्षकांना तडकाफडकी निलंबित केले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. केंद्रप्रमुख, उपकेंद्रप्रमुख व पर्यवेक्षक अशा २१ शिक्षकांविरुद्धही कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.
तिसऱ्या पेपरच्या दिवशी भरारी पथकाने एका परीक्षा केंद्राची पाहणी केली असता गंभीर बाबी उघड झाल्या. केंद्रावर ५८४ विद्यार्थ्यांची नोंदणी असून ५८१ विद्यार्थी उपस्थित होते. बसण्याची व्यवस्था अत्यंत दाटीवाटीची, टिनशेडमध्ये परीक्षा, अपुरा प्रकाश, पंख्यांची कमतरता, वीज गेल्यास जनरेटरची सुविधा नसणे, तसेच केवळ ८ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असल्याचे आढळले. नमुना तपासणीत अनेक विद्यार्थ्यांची उत्तरे शब्दशः समान असल्याचे स्पष्ट झाले, ज्यामुळे सामूहिक कॉपी झाल्याचा संशय बळावला आहे.
या सर्व प्रकारामुळे प्रशासनाच्या कॉपीमुक्त मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून जिल्ह्यात शैक्षणिक व्यवस्थेवरच टीका होत आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.






