Raghav Chadha News: राघव चड्ढांची राज्यसभा उपनेतेपदावरुन हटवले, बोलण्यावरही मर्यादा; नेमकं काय आहे कारण?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राघव चड्ढा हे पक्षाशी सल्लामसलत न करता काही विशिष्ट मुद्द्यांवर बोलत होते. राज्यसभेत ज्या मुद्द्यांवर ते बोलणार होते, त्याबद्दल त्यांनी पक्षाला माहिती दिली नव्हती. आम आदमी पक्षाने याबाबत त्यांना ताकीदही दिली होती. त्यांच्यावर केलेल्या कारवाईमागील कारण पक्षाने अद्याप स्पष्ट केलेले नसले तरी, बेशिस्त आणि पक्षाच्या धोरणांचे पालन न करणे ही पक्षाच्या या निर्णयामागील कारणे असण्याची शक्यता आहे.
आम आदमी पार्टीने या संदर्भात राज्यसभा सचिवालयाला एक पत्र सादर केले आहे. गेल्या काही दिवसांपासून राघव चड्ढा संसदेत सातत्याने सार्वजनिक मुद्दे मांडत आहेत. विमानतळावरील १० रुपयांच्या चहापासून ते डिलिव्हरी बॉयपर्यंतचे सार्वजनिक मुद्दे संसदेत जोरदारपणे मांडत होते. याच दरम्यान त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.या सगळ्या गदारोळानंतर चड्ढा यांना संसदेत बोलण्यासाठी दिलेला वेळही कमी केला जाईल.
राघव चड्ढा हे आम आदमी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात बोलतात, अशी राजकीय वर्तुळात बऱ्याच काळापासून चर्चा आहे. राघव चड्ढा यांच्यावर कारवाई होण्याची चार कारणे समोर आली आहेत. यातील,
पहिले कारण: दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि इतरांना जामीन मंजूर झाला तेव्हाही ते शांत होते.
दुसरे कारण: राघव चड्ढा यांना पक्षाच्या कोट्यातून नेमून दिलेल्या वेळेत राज्यसभेत बोलत होते. परिणामी, पक्षाच्या इतर खासदारांना एकतर संधी मिळाली नाही किंवा मर्यादित संधी मिळाली.
तिसरे कारण: ते पक्षाची भूमिका योग्यरित्या मांडू शकले नाहीत किंवा पक्षाच्या मुद्द्यांवर बोलणे टाळले.
चौथे कारण: आपमधील अंतर्गत कलह
सध्या राघव चड्ढा यांनी अद्याप या घटनेवर सार्वजनिकरित्या प्रतिक्रिया दिलेली नाही. या घटनेने आम आदमी पक्षातील अंतर्गत कलहदेखील चव्हाट्यावर आला आहे. आम आदमी पक्षाचे सध्या राज्यसभेत मर्यादित खासदार आहेत. संजय सिंह यांच्या तुरुंगवासानंतर, राघव चड्ढा यांना अनौपचारिकपणे उपनेतेपदाची जबाबदारी देण्यात आली होती. ते अनेक महत्त्वाच्या चर्चांमध्ये सक्रिय होते.






