२२ राज्यांसाठी मान्सूनचा इशारा जारी केला असून महाराष्ट्रात अवकाळी पाऊस सुरु झाला आहे (फोटो - istcok)
IMD Weather Update : नवी दिल्ली : सध्या भर उन्हामध्ये अवकाळी पावसाचा जोर वाढला आहे. सकाळी जबरदस्त ऊन तर संध्याकाळी धो-धो पाऊस असे दुहेरी वातावरण अनुभवायला मिळत आहे. देशातील विविध राज्यामध्ये हे वातावरण निर्माण झाला असून याचा सर्वात मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. अवकाळी पावसामुळे उगवलेले पिक जमीनदोस्त होत आहे. दरम्यान, पुढील 92 तासांबाबत हवामान खात्याकडून देशातील 22 राज्यांना अलर्ट देण्यात आला आहे. ही देशव्यापी हवामानातील अस्थिरता ५ एप्रिलपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. तुमच्या राज्यात काय परिस्थिती असेल ते जाणून घेऊया.
भारताच्या बहुतांश भागातील हवामान हे दुहेरी झाले आहे. कधी कडक ऊन पडेल तर कधी जोरदार पाऊस याचा अंदाज लावता येत नाही. यामुळे सामान्य लोकांची धांदल उडाली आहे. एकीकडे सूर्याची उष्णता हळूहळू वाढत असताना, आकाशात ढगांचे दाटून येणे लोकांना गोंधळात टाकत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) एक नवीन इशारा जारी केला आहे, त्यानुसार देशभरातील २२ राज्यांमध्ये हवामान पुन्हा एकदा बदलणार आहे. मागील पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावाची तीव्रता कमी झाली असली तरी, त्याचे परिणाम उत्तर भारतातील मैदानी प्रदेशांपासून ते उंच पर्वतांपर्यंत स्पष्टपणे दिसत आहेत.
महाराष्ट्रामध्ये हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. 31 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उपग्रहामधील फोटोग्राफमध्ये महाराष्ट्रात आणि प्रामुख्याने मुंबई,पुणे या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात काळे ढग निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. उत्तर भारतामध्ये दाटलेले ढग आता हळूहळू दक्षिणेकडे सरकत असून पश्चिम भारतात सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा : भोंदूबाबा प्रकरणावरुन सपकाळांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी, म्हणाले; आता खरातची…
दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गारपीट
राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश आणि बिहारमधील रहिवाशांनी येत्या काही तासांत मुसळधार पावसासाठी तयार राहण्याचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दिल्लीत ३ आणि ४ एप्रिल रोजी मेघगर्जनेसह हलका पाऊस तर पडेलच, पण गारपीट होण्याचीही दाट शक्यता आहे. उत्तर प्रदेशात परिस्थिती आणखी गंभीर असू शकते, जिथे ४ आणि ५ एप्रिल रोजी ताशी ५० ते ७० किलोमीटर वेगाच्या सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊसाचा इशारा देण्यात आला आहे.
बिहारमध्येही ५ आणि ६ एप्रिल रोजी हवामान अत्यंत अस्थिर राहण्याची शक्यता असून, तीव्र वादळी पाऊस आणि विजांचा धोका आहे. या बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे, कारण गारपिटीमुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. पंजाब आणि हरियाणासारख्या राज्यांमध्येही अशाच प्रकारचा इशारा देण्यात आला असून, वायव्य भारतात तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा : आंध्र प्रदेशला मिळाली नवी राजधानी; आंध्र प्रदेश पुनर्रचना सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर
ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
उत्तर आणि मध्य भारत, तसेच ईशान्येकडील राज्यांमध्ये हवामान गंभीर आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार पावसाबाबत कडक इशारा देण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत या राज्यांमध्ये, तसेच पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली.
राजस्थानवरील चक्रीवादळी स्थिती आता हळूहळू ईशान्य राजस्थानकडे सरकली आहे, ज्यामुळे तेथे धुळीची वादळे आणि मेघगर्जनेसह पावसाचे प्रमाण वाढू शकते. या बदलत्या हवामानादरम्यान जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसारख्या डोंगराळ राज्यांमध्ये हिमवर्षाव आणि पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. लोकांना अचूक हवामान माहिती मिळाल्यानंतरच घराबाहेर पडण्याचा आणि खराब हवामानात सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचा सल्ला दिला जात आहे.






