नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने टाटा समूहाच्या डिजिटल पेमेंट ऍप टाटा पेमेंट्सला पेमेंट एग्रीगेटर (पीए) परवाना मंजूर केला. ज्यामुळे कंपनीला त्यांच्या प्लॅटफॉर्मद्वारे ई-कॉमर्स व्यवहार सुलभ करण्यात मदत होणार आहे. टाटा पेमेंट हे समूहाच्या उपकंपनी टाटा डिजिटलद्वारे चालवले जाणार असून, जे त्यांचे डिजिटल व्यवसाय सांभाळते.
टाटा पे बहुप्रतीक्षित पेमेंट परवाना सुरक्षित करण्यासाठी रेझरपे, कॅशफ्री, गुगल पे, पेटीएम आणि इतर कंपन्यांच्या यादीत सामील झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पेमेंट एग्रीगेटर लायसन्समुळे आता टाटा त्यांच्या उपकंपन्यांमधील सर्व ईकॉमर्स व्यवहारांना सक्षम बनवू शकतो. ज्यामुळे निधीचे व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे करण्यात मदत होणार आहे.
डिजिओलाही मंजूरी टाटा पेबरोबर बंगळुरू आधारित ओळख पडताळणी स्टार्टअप डिजिओनेही पीए परवाना मिळवला आहे. ज्याला गुंतवणूक प्लॅटफॉर्म ग्रोव्हने पाठिंबा दिला आहे. डिजिओ अनेक फिनटेकसाठी डिजिटल ओळख करून देण्याचे माध्यम असून, पेमेंट सेवा प्रदान करण्यास सक्षम असणार आहे.
‘यूपीआय’ व्यवहारांचा नवा उच्चांक
युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजे ‘यूपीआय’ द्वारे होणाऱ्या व्यवहारांनी मूल्यात्मक आणि संख्यात्मक अशा दोन्ही पातळींवर नवे उच्चांक नोंदविले आहेत. डिसेंबरमध्ये ‘यूपीआय’ द्वारे 12.02 अब्ज व्यवहार झाले असून, त्यांचे मूल्य 18.23 लाख कोटी रुपये आहे.
नोव्हेंबरच्या तुलनेत त्यात अनुक्रमे पाच टक्के आणि सात टक्के वाढ झाली आहे. वर्ष 2022 च्या तुलनेत 2023 मधील व्यवहारांचे मूल्य 183 लाख कोटी रुपये असून, त्यात वार्षिक 59 टक्के वाढ झाली आहे. व्यवहारांच्या संख्येच्या तुलनेत 45 टक्के वाढ झाली असून, 2023 मध्ये एकूण 117 अब्ज व्यवहार झाले आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.