तरुणपणात केला होता अर्ज अन् म्हातारपणी आली नोकरीची ‘ऑफर’

पश्चिम बंगालमधील काही वृद्ध लोकांसोबत एक अनोखा प्रकार घडला. त्यांना वयाच्या त्या टप्प्यावर सरकारी नोकऱ्यांसाठी 'ऑफर लेटर' मिळाले आहे जेव्हा त्यांना नोकरीची नाही तर सेवानिवृत्तीच्या लाभांची गरज आहे.

    कोलकाता : पश्चिम बंगालमधील काही वृद्ध लोकांसोबत एक अनोखा प्रकार घडला. त्यांना वयाच्या त्या टप्प्यावर सरकारी नोकऱ्यांसाठी ‘ऑफर लेटर’ मिळाले आहे जेव्हा त्यांना नोकरीची नाही तर सेवानिवृत्तीच्या लाभांची गरज आहे. हुगळीच्या फुरफुरा शरीफ येथील रहिवासी तुषार बॅनर्जी यांना नुकतेच पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळाकडून ‘ऑफर लेट’र मिळाले. ज्यामध्ये सरकारी शाळेत शिक्षक पदावर नियुक्ती झाल्याची माहिती देण्यात आली होती.

    तुषार बॅनर्जी यांच्यासारख्या शेकडो लोकांनी 1980 च्या दशकात नोकऱ्यांसाठी अर्ज केला होता. अटी व शर्ती पूर्ण करूनही नोकऱ्या न मिळाल्याने अनेकांनी 1983 मध्ये न्यायालयात धाव घेतली. न्यायालयीन कारवाईनंतर हुगळीच्या शिक्षण विभागाने 66 जणांच्या नावाने ‘जॉब ऑफर लेटर’ जारी केले. या यादीतील तीन जण आता या जगात नाहीत. बाकीच्या लोकांचे म्हणणे आहे की, त्यांना हे पत्र मिळू नये पण पेन्शन पण इतर बाबींचे पेमेंट मिळाले पाहिजे, हा त्यांचा हक्क आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन हुगळी जिल्हा प्राथमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शिल्पा नंदी यांनी स्पष्टीकरण दिले.

    दरम्यान, 40 वर्षांनंतर अशाप्रकारे नोकरीचे नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर त्यांना आनंद होण्याऐवजी धक्काच बसला आहे. कारण आता ही मंडळी नोकरी करण्यास सक्षम नाही. त्यामुळे आता ही मंडळी पेन्शन अर्थात निवृत्ती वेतनाच्या प्रतिक्षेत असल्याचे सांगितले जात आहे.