फोटो सौजन्य - सोशल मीडिया
नवी दिल्ली : 18 व्या लोकसभेचे अधिवेशन सध्या सुरु आहे. मागील दोन दिवसांपासून खासदारांचा शपथविधी सोहळा सुरु असून आज ओम बिरला यांची अध्यक्षपदाची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, खासदारांच्या शपथविधी सोहळ्यावेळी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे नेता असदुद्दीन ओवैसी यांनी शपथ चर्चेचा विषय ठरला आहे. शपथविधी झाल्यानंतर ओवैसींनी ‘जय पॅलेस्टाईन’ दिलेली घोषणा त्यांना भोवली आहे. असदुद्दीन ओवैसी यांची तक्रार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे करण्यात आली आहे. असदुद्दीन ओवैसी यांच्या संसदेच्या सदस्येवर देखील टागंती तलवार आहे.
राष्ट्रपतींकडे तक्रार
एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी खासदारकीची शपथ घेतली. यावेळी त्यांनी जय भीम, जय तेलंगणा व जय पॅलेस्टाईन अशी घोषणा दिली. त्यामुळे भाजप खासदारांनी एकच गोंधळ केला. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर औवेसींवर टीकेची झोड उठली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी ट्विट करत राष्ट्रपतींकडे तक्रार केल्याचे सांगितले आहे. ट्वीटमध्ये लिहिले आहे की, राष्ट्रपतींकडे ओवैसीसंदर्भात तक्रार केली आहे. भारतीय राज्य घटनेच्या नियम 102 आणि 103 नुसार ही तक्रार दिली आहे. त्यात त्यांचे संसद सदस्यत्व अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे.
लोकसभा सदस्यत्व रद्द होण्याचा धोका
संसद सदस्य म्हणून निवडणूक लढवण्यासाठी सर्वात पहिला नियम आहे तो म्हणजे निवडणूक लढवणारा व्यक्ती भारतीय नागरिकच हवा. तसेच शपथ घेताना त्यात स्पष्ट नमूद केले आहे की, ‘कायद्याने स्थापित केलेल्या भारतीय संविधानावर खरी श्रद्धा आणि निष्ठा असेल.’ आता ओवैसी यांनी शपथ घेताना दुसऱ्या देशाच्या घोषणा दिल्या. त्यामुळे हा प्रकार संसद नियमाचे उल्लंघन करणारा आहे. नियमानुसार, असदुद्दीन ओवैसी यांनी दुसऱ्या देशासंदर्भात निष्ठा दाखवली आहे. त्यामुळे त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता वर्तवली आहे.