अयोध्या : उत्तर प्रदेशातील (UP) अयोध्येमध्ये (Ayodhya) प्रभू श्री रामांची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. यासाठी देशामध्ये जय्यत तयारी सुरु असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र या उत्साह फक्त देशापुरता मर्यादित नसून संपूर्ण जगामध्ये राम मंदिर (Ram Mandir) उद्घाटनाबाबत चैतन्य निर्माण झाले आहे. त्यामुळे परदेशातील हिंदूसाठी या मंदिर उद्घाटन (Ayodhya Ram Mandir Inauguration) सोहळा पाहण्यासाठी खास सुविधा आखण्यात येत आहे. भारतासह तब्बल 160 देशांमध्ये अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाचा सोहळा थेट प्रेक्षेपणाच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे. यामध्ये सुप्रसिद्ध न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरचा (New York Times Square) देखील समावेश आहे.
संपूर्ण हिंदू धर्मीयांसाठी 22 जानेवारी रोजीचा अयोध्या मंदिर उद्घाटन सोहळा महत्त्वाचा असणार आहे. जगभरातील हिंदू लोक या सोहळ्यासाठी उत्सुक असून जगभरातील 50 हून अधिक देशांमध्ये राम उद्घाटन सोहळा लाईव्ह स्वरुपात दाखवला जाणार आहे. विश्व हिंदू परिषदेने याबाबत तयारी करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, कॅनडा यांसारख्या अनेक देशांमध्ये पूजा पाठ, शोभा यात्रा व प्राणप्रतिष्ठा सोहळा लाईव्ह दाखवला जाणार आहे.
याबाबत विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी माध्यमांना सविस्तर माहिती दिली आहे. आलोक कुमार म्हणाले, “जगामध्ये 160 देशांमध्ये हिंदू लोक राहतात, त्या देशांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. 50 हून अधिक देशांमध्ये मोठे कार्यक्रम घेतले जातील. तसेच प्राणप्रतिष्ठा सोहळा लाईव्ह स्वरुपामध्ये दाखवला जाईल’ अशी माहिती त्यांनी दिली आहे.
पुढे आलोक कुमार म्हणाले, “आलोक कुमार यांनी सांगितले की, अमेरिकेतील 300, ब्रिटनमध्ये 25, ऑस्ट्रेलियातील 30, कॅनडामध्ये 30, मॉरिशसमध्ये 100 व्यतिरिक्त आयर्लंड, फिजी, इंडोनेशिया आणि जर्मनी सारख्या 50 हून अधिक देशांमध्ये रामललाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जातील. कार्यक्रमांबद्दल सांगायचे तर शहरातील मंदिरांमध्ये शोभा यात्रा, हवन पूजा, हनुमान चालीसा पठण व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण दाखविण्याची तयारी सुरू आहे. याशिवाय, प्रभू रामाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी अमेरिका, कॅनडा, जर्मनी, फिजी अशा 50 देशांच्या प्रतिनिधींना अयोध्येचे आमंत्रण दिले आहे.”असे त्यांनी स्पष्ट केले.