बेंगळुरू – काँग्रेसचे ट्विटर हँडल (Congress Twitter) तात्पुरते ब्लॉक करण्याच्या निर्णय बंगळुरू न्यायालयाने (Bengluru Session Court) घेतला होता. मात्र, सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला कर्नाटक उच्च न्यायालयाने (Karnataka High Court) स्थगिती दिली आहे. एका याचिकेवर सुनावणी करत असताना बंगळुरू न्यायालयाने दोन्ही ट्विटर अकाउंट ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते. भारत जोडो यात्रेच्या (Bharat Jodo Yatra) प्रमोशनदरम्यान कॉपी-राईट कायद्याचे (Copy Right Act) उल्लंघन झाल्यामुळे अकाऊंट ब्लॉक केले जाणार होते. मात्र, न्यायालयाच्या या निर्णयानंतर काँग्रेस पक्षाने कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
काँग्रेसने एका चित्रपटातील गाणे संबंधित कंपनीच्या परवानगीशिवाय वापरल्याबद्दल काँग्रेस आणि भारत जोडो यात्रेचे ट्विटर हँडल ब्लॉक करण्यात यावेत, असे आदेश बंगळुरच्या न्यायालयाने दिले होते. काँग्रेसवर ‘KGF-2’ चित्रपटातील गाणे वापरून कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘एमआरटी म्युझिक’ने याबाबत न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर कंपनीच्या याचिकेवर बंगळुरू न्यायालयाने भारत जोडो अभियानाच्या वेबसाइटवर आणि काँग्रेसच्या ट्विटर अकाउंटवर बंदी घालण्याचे आदेश दिले.
बंगळुरू न्यायालयाच्या या निर्णयानंतर काँग्रेस पक्षाने कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल करताना आदेश रद्द करण्याची मागणी केली. त्यानंतर उच्च न्यायालयात काँग्रेस पक्षातर्फे बाजू मांडताना ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, ४५ सेकंदांच्या क्लिपमुळे काँग्रेस आणि भारत जोडी यात्रेचे संपूर्ण ट्विटर हँडल ब्लॉक करू नये किंवा ते हटवू नये. याप्रकरणी एमआरटी म्युझिक कंपनीने काँग्रेस पक्ष, राहुल गांधी, जयराम रमेश आणि सुप्रिया श्रीनेत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.