नवी दिल्ली – देशातील राष्ट्रीय राजकीय पक्ष आणि प्रादेशिक पक्षांकडे २०१९-२०२० साली असलेली संपत्ती एसोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्सने जाहीर केली आहे. यात सात राष्ट्रीय पक्षांची संपत्ती ६९८८.५७ कोटी रुपये इतकी आहे. तर देशातील विविध राज्यातील ४४ प्रादेशिक पक्षांची संपत्ती २,१२९.३८ कोटी रुपये इतकी नोंदवण्यात आली आहे.
राष्ट्रीय पक्षांमध्ये सर्वाधिक संपत्ती ही भाजपाच्या नावे आहे. भआजपाकडे ४८४७.७८ कोटी रुपयांची संपत्ती असून, राजकीय पक्षांच्या यादीत सर्वात श्रीमंत पक्ष अशी सध्या भाजपाची ओळख आहे. एकूण राजकीय पक्षांकडे असलेल्या संपत्तीपैकी ६९.३७ टक्के संपत्ती ही एकट्या भाजपाकडे आहे. या यादीत दुसऱ्या स्थानी मायावती यांचा बसपा हा पक्ष आहे. बसपाकडे ६९८.३३ कोटी रुपये ( पक्षांच्या एकूण संपत्तीपैकी ९.९९ टक्के), तिसर्या स्थानी राष्ट्रीय काँग्रेस आहे. काँग्रेसकडे ५८८.१६ कोटी ( एकूण संपत्तीच्या ८.४२ टक्के) इतकी संपत्ती आहे.
प्रादेशिक पक्षांनी २०२८.७१ कोटी रुपयांची संपत्ती घोषित केली आहे. ही एकूण प्रादेशिक पक्षांच्या एकूण संपत्तीच्या ९५ टक्के आहे. यात पहिल्या ,क्रमांकावर अखिलेश यादव यांच्या सपाचे नाव आहे. सपाकडे ५६३.४७ कोटी (२६.४६ टक्के) इतकी संपत्ती आहे. त्यानंतर तेलंगणा राष्ट्र समितीने ३०१.४७ कोटी रुपये तर एआयडीएमकेने २६७.६१ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे.
राष्ट्रीय पक्षांपैकी भाजपाने ३२५३ कोटी रुपयांची तर बसपाने ६१८.८६ कोटी रुपयांची संपत्ती फिक्स्ड डिपॉझिटच्या माध्यमातून जाहीर केली आहे. तर काँग्रेसने यात २४०.९० कोटी रुपयांचा उल्लेख केला आहे.
सपाने ४३४.२१ कोटी रुपये, टीआरएस २५६.०१ कोटी, एआयडीएमके २४६.९० कोटी रुपये, द्रमुक १६२.४२ कोटी, शिवसेना १४८.४६ कोटी रुपयांचे फिक्स्ड डिपॉझिट असल्याचे जाहीर केले आहे.