आजच्या ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर
26 Sep 2025 01:37 PM (IST)
मार्क रुटे यांनी सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट शब्दांत म्हटले की “ट्रम्प यांनी भारतावर घातलेले कर केवळ दिल्लीवरच नाही तर मॉस्कोवरही मोठा परिणाम घडवत आहेत. भारताचा रशियासोबतचा तेल व्यापार आणि इतर आर्थिक देवाणघेवाण या करांमुळे दबावाखाली आली आहे.” रुटे यांच्या या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
26 Sep 2025 01:33 PM (IST)
भाजपाचे मध्य प्रदेशमधील ज्येष्ठ नेते आणि सरकारमधील नगरविकास व गृहनिर्माण मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी गुरूवारी केलेल्या एका विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांच्यावर एक आक्षेपार्ह विधान केले. विजयवर्गीय यांनी म्हटले की, विरोधी पक्षनेता आपल्या बहिणीचा जाहीर मुका घेतो. त्यांच्यात संस्काराची कमतरता आहे, अशी टीका कैलाश विजयवर्गीय यांनी राहुल गांधींवर केली आहे.
26 Sep 2025 01:31 PM (IST)
“केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दोन्ही मुलांनी अफरातफर करत जनतेची अर्थिक फसवणूक केली आहे. प्रत्येक किलोमीटर मागे पैसे खात टोलच्या माध्यमातून मिळवलेले पैसे हे स्वतःच्या मुलांच्या कंपनीमध्ये वळवले गेले आहेत,” असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
26 Sep 2025 12:55 PM (IST)
मला आता जास्त वेळ राज्यात द्यावा लागणार आहे, फिरावं लागणार आहे. तुमच्यावर महत्त्वाची जाबदाबदरी असणार आहे, ती नीट पार पाडा. मागचा अजित पवार आणि आत्ताच अजित पवार लय मोठा फरक आहे माझ्याकडे यायला संकोच करू नका, असे आवाहन अजित पवार यांनी केले. जसं वय वाढतं तसं फरक होतो वय वाढलं की मॅच्युरिटी येते. आपण आधी काही केलं तर आपल्याला पांघरून घालायला साहेब असायचे आता आपल्यालाच पांघरून घालायचा आहे, असेही अजित पवार म्हणाले.
26 Sep 2025 12:45 PM (IST)
हुथी बंडखोरांनी इस्त्रायलच्या तेल अवीव शहरावर ड्रोन हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर इस्त्रायलने आक्रमक भूमिका घेत येमेनची राजधानी असलेल्या सना शहरावर मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात 9 पेक्षा अधिक लोक मारले गेल्याची माहिती आहे. येमनेचे लष्करी ठिकाणांना सुद्धा इस्त्रायलने टार्गेट केले.
26 Sep 2025 12:42 PM (IST)
पुणे जिल्ह्यासाठी आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील तीन तासांत पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नगरिकांनी या काळात आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान संबंधी ही माहिती सचेत अँपद्वारे प्राप्त झाली आहे.
26 Sep 2025 12:35 PM (IST)
पुणे शहरातील ट्रॅफिकपासून सुटका व्हावी यासाठी आता पुणे पोलिसांकडून शहरातील सुमारे 500 सिग्नल जंक्शनवर AI तंत्रज्ञानावर आधारित 'इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम' (ITMS) उभारण्यात येणार असून या नव्या सिस्टीमसाठी तब्बल 1100 कोटींचा खर्च होणार आहे. ही नवी सिस्टीमचं काम येत्या 3 महिन्यांत सुरू होणार असल्याची पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. 'इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम' ही सिग्नल यंत्रणा गाड्यांचा वेग, त्यांची संख्या तसंच प्रवासाचा वेळ आणि पीक अवर मधील ट्रॅफिकचा अभ्यास करून ऑटोमॅटीक सिग्नल सेट करते. 'एआय'च्या साहाय्याने सिग्नल सिंक्रोनायझेशन साधले जाते. त्यामुळे अनावश्यक वाहनांची गर्दी होत नाही आणि वाहतूक सुरळीतपणे सूरू राहते. या सिस्टीममुळे शहरात नेत्यांचे दौरे असतात त्यावेळी वाहतूक कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय टाळली जाईल आणि रुग्णवाहिकेसाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्याचे काम या तंत्रज्ञानाच्या मदतीने करता येऊ शकते, असं सांगितलं जात आहे.
26 Sep 2025 12:25 PM (IST)
महिला व बालविकास विभागामार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना यंदाच्या दिवाळीनिमित्त भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी 2 हजार रूपये देणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती वरदा सुनिल तटकरे यांनी दिली आहे. यासाठी शासनाने 40.61 कोटींचा निधी उपलब्ध करत त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे.
26 Sep 2025 12:15 PM (IST)
बीडच्या टोकवाडी येथे आत्माराम भांगे यांनी ओबीसी आरक्षण संपल्याच्या विवंचनेतून गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. भांगे हे ऑटोचालक असून त्यांची दोन मुलं पोलीस भरतीची तयारी करत होते. अशातच ओबीसी आरक्षण संपल्याच्या धक्क्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती भांगे कुटुंबियांनी परळी ग्रामीण पोलिसाना दिली आहे. त्यानंतर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
26 Sep 2025 12:02 PM (IST)
लेहमधील हिंसाचारानंतर, तणाव कायम आहे आणि शहरात संचारबंदी लागू आहे. परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे. हिंसाचारानंतर, सोनम वांगचुकशी संबंधित एका स्वयंसेवी संस्थेविरुद्ध महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली आहे. तिचा एफसीआरए रद्द करण्यात आला आहे. अनियमितता आढळली आणि परदेशी निधीबाबत अचूक माहिती देण्यात आलेली नाही असा आरोप करण्यात आला आहे.
26 Sep 2025 11:55 AM (IST)
धाराशिव जिल्ह्यातील लाखो हेक्टरवरील पिके धोक्यात शेतकरी अडचणीत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र बेजबाबदार वर्तन केल्याचे समोर आले आहे. जिल्हा संकटात असताना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार मात्र नाच गाण्यात व्यग्र असल्याचे दिसून आल्याने संताप व्यक्त होत आहे. 24 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील नागरिक संकटात असतानाच तुळजापुरातील एका कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी डान्स केला. जिल्हाधिकाऱ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे
26 Sep 2025 11:45 AM (IST)
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये जोरदार राजकारण तापले आहे. बिहारच्या राजकारणामध्ये आता कॉंग्रेस नेत्या आणि खासदार प्रियांका गांधी यांची एन्ट्री झाली आहे. प्रियंका गांधी बिहारमध्ये अधिकार यात्रा काढणार असून यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.
26 Sep 2025 11:35 AM (IST)
पैशांचं सोंग घेता येत नाही असे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार म्हणाले होते. यावरुन जोरदार टीका झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अजित पवार म्हणाले की, ग्रामीण भागामध्ये गेल्यावर तिथल्या लोकांना समजेल अशा भाषेत मी बोलतो. आपण आपल्या घरात जसं बोलतो, तशी भाषा मी वापरतो. आपणही कित्येकदा बोलताना म्हणतो ना की बाबा रे पैशांचं सोग घेता येत नाही. काही गोष्टी बजेटमध्ये बसवाव्या लागतात, त्या अर्थाने मी बोललो होतो. पण विरोधकांनी त्याचा चुकीचा अर्थ घेतला. ते वाक्य बोलण्याआधी, त्यानंतर मी काय बोललो, ते विरोधक ऐकतच नाहीत, मधलं एक वाक्य घेतात आणि टीका, टोमणे सुरू करतात, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे.
26 Sep 2025 11:25 AM (IST)
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र अधिक पोषक ठरल्याने राज्यात आज २६ सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मान्सून परतीच्या मार्गावर असताना पुन्हा सक्रिय झाल्यामुळे महाराष्ट्रातील हवामानात बदल पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भ या भागांसाठी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
26 Sep 2025 11:15 AM (IST)
राज्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील शासकाय व ५० महाविद्यालय तसेच संलग्नित रुग्णालयांमधील गट-क तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी सुरू असलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्याचा आदेश वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिला आहे.
26 Sep 2025 11:02 AM (IST)
भारतातील चर्चेमधील पंतप्रधानांमध्ये मनमोहन सिंग यांचे नाव आवश्य येते. क आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि राजकारणी होते, ज्यांनी २००४ ते २०१४ या काळात भारताचे १४ वे पंतप्रधान म्हणून काम केले. ते भारताचे पहिले आणि एकमेव शीख पंतप्रधान होते. ऑक्सफर्ड आणि केंब्रिजमध्ये शिक्षण घेतलेल्या सिंग यांनी १९९१ च्या आर्थिक सुधारणांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यातून भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात मदत झाली. कॉंग्रेसच्या राजकारणामध्ये आणि देशाचे अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे मनमोहन सिंग यांची आज जयंती आहे.
26 Sep 2025 11:01 AM (IST)
श्रीलंकेच्या संघाने साखळी सामन्यामध्ये कमालीची कामगिरी केली होती पण सुपर 4 मध्ये त्यांना कोणत्याही सामन्यामध्ये विजय मिळवता आला नाही. सुपर 4 मध्ये भारताचा हा शेवटचा सामना आहे. भारतीय संघ रविवारी १२ वा आशिया कप फायनल खेळेल आणि त्याआधी शुक्रवारी सुपर ४ टप्प्यातील अंतिम सामन्यात त्यांचा सामना श्रीलंकेशी होईल.
26 Sep 2025 10:45 AM (IST)
Xiaomi 17 Pro आणि Xiaomi 17 Pro Max चीनमध्ये लाँच करण्यात आले आहे. कंपनीने लाँच केलेले हे लाईनअप Qualcomm Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसर आणि Android 16-बेस्ड HyperOS सह येतात. प्रो मॉडेल्समध्ये रियर कॅमेरा मॉड्यूलच्या चारी बाजूला सेकेंडरी डिस्प्ले देण्यात आला आहे.
26 Sep 2025 10:30 AM (IST)
मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा तसेच धाराशिव जिल्ह्याला मुसळधार पावसाने तडाखा दिला आहे. मागील १५ दिवसांच्या सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सध्या पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी पुढील काही तासांत पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. धाराशिव जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली असून, सोलापूरमधील सीना नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
26 Sep 2025 10:06 AM (IST)
पवन कल्याणचा अॅक्शन थ्रिलर “दे कॉल हिम ओजी” या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आधीच धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटात इमरान हाश्मी खलनायकाची भूमिका साकारत आहे. हा इमरानचा पहिला तेलुगू चित्रपट आहे. भारतीय चित्रपट इतिहासातील हा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट मानला जात आहे. पवन कल्याणच्या “दे कॉल हिम ओझी” या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई आता आपण जाणून घेणार आहोत. बातमी सविस्तर वाचा...
26 Sep 2025 09:55 AM (IST)
आयसीसी महिला विश्वचषका (Women’s Cricket World Cup 2025) ला फक्त चार दिवस शिल्लक आहेत. काल भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये विश्वचषकाआधी सराव सामना खेळवण्यात आला. या सामन्यामध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडच्या संघाने भारताला १५२ धावांनी पराभूत केले. या सामन्यात टीम इंडियाला मोठा धक्का बसला. भारताची अष्टपैलू अरुधती रेड्डी हिला गोलदाजी करताना दुखापत झाली आहे. महिला विश्वचषकापूर्वी भारताला मोठा धक्का बसला जेव्हा गुरुवारी इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान वेगवान गोलंदाज अरुंधती रेड्डी जखमी झाली.
26 Sep 2025 09:48 AM (IST)
भारतात आज 26 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,443 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,489 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,582 रुपये आहे. भारतात काल 25 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,536 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,574 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,652 रुपये होता. भारतात 24 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,570 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,606 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,678 रुपये होता.
26 Sep 2025 09:42 AM (IST)
पंजाबी सुपरस्टार दिलजीत दोसांझने २०२५ च्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांमध्ये “सर्वोत्तम अभिनेत्याचा अभिनय” या श्रेणीत नामांकन मिळवून देशाला अभिमान वाटेल असे काम केले आहे. नेटफ्लिक्सच्या “अमर सिंग चमकिला” या चरित्रात्मक नाटकातील त्याच्या दमदार अभिनयासाठी हे नामांकन मिळाले आहे. या चित्रपटात, दिलजीतने पंजाबी गायक अमर सिंग चमकिलाची भूमिका साकारली होती, जे त्यांच्या धाडसी गाण्यांमुळे आणि दुःखद निधनामुळे चर्चेत आले होते. इम्तियाज अली दिग्दर्शित, १२ एप्रिल २०२४ रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला. चित्रपटामध्ये दिलजीतसोबत परिणीती चोप्रा देखील दिसली होती.
26 Sep 2025 09:38 AM (IST)
बिग बॉस १९ च्या घरात प्रत्येक दिवस नवीन नाट्य घेऊन येतो. प्रत्येक स्पर्धक स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्यासाठी आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करत असल्याने मारामारी वाढत्या प्रमाणात सामान्य झाली आहे. घर दोन गटात विभागले गेले आहे आणि प्रत्येक दिवस एक नवीन भांडण घेऊन येतो. निर्माते सतत स्वतःचे ट्विस्ट जोडून गेमला आणखी मनोरंजक बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. आता नवीन भागानंतर सोशल मिडियावर आणखीनच गोंधळ उडाला आहे, ज्यामध्ये चित्रपट रात्री दाखवण्यात आला आहे, परंतु येथेही गोंधळ उडतो.
26 Sep 2025 09:34 AM (IST)
गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण आदिवासी समुदायांच्या कृषी आणि वन-आधारित उपजीविकेला चालना देण्यासाठी किरकोळ वनोपज तसेच धान्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर मुख्य रस्त्यालगत छोट्या आकाराची नवीन गोदामे उभारण्यात येत आहेत. अन्न-धान्य व लहान वन उत्पादने (एमएफपी) साठवण्यासाठी गोदामांच्या बांधकामासाठी ‘नाबार्ड’कडून औपचारिक भागीदारीतून मिळालेल्या उत्कृष्ट सहकार्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला.
26 Sep 2025 09:32 AM (IST)
नवरात्रीच्या खास दिवसांमध्ये, देशाच्या कानाकोपऱ्यात गरबा खेळाला जात आहे. देवीच्या स्तुतीचे मंत्र गुंजत आहेत. याच दरम्यान काल संध्याकाळी अंबानी कुटुंबामध्येही दांडिया नृत्याचा मोठा खेळ पाहायला मिळाला. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, नीता अंबानी यांनी त्यांच्या घरी गरबा कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे दिसून येत आहे. या खास प्रसंगी कुटुंबातील सर्वांनी उत्साहाने गरब्यामध्ये भाग घेतला. नीता अंबानींनी त्यांच्या सुंदर नऊ रंगांच्या लेहेंग्यात सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले, तर त्यांची सून राधिका मर्चंट आणि श्लोका मेहता यांनीही ग्लॅमरमध्ये भर घातली. या तिघींचा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
26 Sep 2025 09:28 AM (IST)
भारतीय जनता पक्षाने (भाजप) बिहार विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. या संदर्भात, गुरुवारी पक्षाने आपले निवडणूक प्रभारी आणि सह-प्रभारी जाहीर केले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना बिहारमध्ये राज्य निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर, केंद्रीय जलशक्ती मंत्री सीआर पाटील यांना राज्य निवडणुकांचे सह-प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
26 Sep 2025 09:27 AM (IST)
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी औषध उत्पादने, फर्निचर आणि जड ट्रकवर १००% नवीन कर लादण्याची घोषणा केली आहे. त्यांनी केलेल्या या घोषणेचा शेअर बाजारावर परिणाम होत असल्याचं पाहयला मिळत आहे. जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५० शुक्रवारी नकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी नकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २४,९३० च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ३७ अंकांनी कमी होता.
26 Sep 2025 09:24 AM (IST)
आसाम पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) गुरुवारी (२५ सप्टेंबर) प्रसिद्ध आसाम गायक जुबिन गर्ग यांच्या मृत्यूप्रकरणी संगीतकार शेखर ज्योती गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. जुबिनसोबत सिंगापूरला जाणाऱ्या नौका प्रवासात ज्या गटात ही दुःखद घटना घडली त्या गटात शेखर ज्योती गोस्वामी हे देखील सहभागी होते. आता या मृत्यूप्रकरणी ते का अडकले आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. बातमी सविस्तर वाचा...
26 Sep 2025 09:20 AM (IST)
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये शेकडो कारागिर दगड फोडून मंदिराची उभारणी करताना दिसून येत आहेत. फार शिताफीने ते दगडावर कोरीव काम करुन याला एक अद्भूत रुप मिळवून देतात. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये मंदराची माहिती देण्यात आली आहे. यात लिहिले आहे की, ‘वेरूळमधील कैलास मंदिर दगडांनी बांधलेले नाही, तर एकाच डोंगरातून कोरलेले आहे. मंदिर कोरण्यासाठी २५,००० टन दगड काढून टाकण्यात आले – सर्व आधुनिक यंत्रांशिवाय, ही जगातील सर्वात मोठी अखंड दगडी बांधकाम आहे. हे मंदिर अथेन्समधील पार्थेनॉनच्या क्षेत्रफळाच्या दुप्पट आहे, तरीही एकाच कड्यावरून वरपासून खालपर्यंत कोरलेले आहे.
26 Sep 2025 09:17 AM (IST)
जिल्हा परिषदेत अनुकंपाधारकांनी गुरुवारी आनंदोत्सव साजरा केला. पालकमंत्री साहेब आम्हाला नोकरी मिळाली, आम्ही सुखावलो, अशा शब्दांत अनुकंपाधारकांनी आनंद व्यक्त केला. सोलापूर जिल्हा परिषदेच्या अनुकंपा भरतीचे काम राज्यात आदर्श असे असल्याचे गौरोद्गार राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काढले.
26 Sep 2025 09:15 AM (IST)
स्पर्धेच्या ४१ वर्षांच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान आशिया कपच्या अंतिम फेरीत आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ असेल. विजयाच्या आनंदात पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले. सामन्याच्या सादरीकरणादरम्यान, सलमानला भारत-पाकिस्तान फायनलबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला. सलमान आगा म्हणाला की त्याला आणि संघाला अंतिम सामन्यात काय अपेक्षा करायची हे माहित आहे. सलमान एवढ्यावरच थांबला नाही. त्याने मागील दोन पराभवांबद्दल निराशा व्यक्त केली आणि भारताला धमकी दिली.
Marathi Breaking Live Updates : बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा शुभारंभ करणार आहेत. या योजनेअंतर्गत, राज्यातील 7.5 दशलक्ष महिलांच्या बँक खात्यात 10000 रुपये थेट हस्तांतरित केले जातील. या रकमेचे एकूण 7500 कोटी रुपये हे वितरण महिलांना उपजीविकेद्वारे सक्षम करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग असल्याचे सांगण्यात आले आहे.
पंतप्रधान या महिला लाभार्थ्यांना संबोधित करतील. योजनेअंतर्गत सुरुवातीला १०००० रुपयांचे अनुदान दिले जाईल, त्यानंतरच्या टप्प्यात दोन लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त आर्थिक मदत अपेक्षित आहे. ही योजना समुदाय-आधारित असेल, ज्यामध्ये बचत गटांशी संबंधित सामुदायिक संसाधनांद्वारे सहभागी महिलांना आर्थिक मदत तसेच प्रशिक्षण दिले जाईल.