ब्रिजभूषण सिंह भाजपला सोडचिठ्ठी देणार? अखिलेश यादव यांचं केलं तोंडभरून कौतुक
उत्तर प्रदेशातील राजकारणात एक नवा पेच निर्माण करणारी घटना समोर आली आहे. भाजपचे वादग्रस्त नेते आणि माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचं जाहीरपणे तोंडभरून कौतुक केलं आहे. यावरून त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ब्रिजभूषण सिंह लवकरच भाजपला सोडचिठ्ठी देऊन समाजवादी पक्षात प्रवेश करू शकतात का? अशा चर्चा रंगल्या आहेत.
संत कबीर नगरमध्ये माजी खासदार शरद त्रिपाठी यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ब्रिजभूषण सिंह यांनी मंचावरून अखिलेश यादव यांना “धार्मिक व्यक्ती” संबोधत त्यांच्या धार्मिकतेचं गुणगान केलं. त्यांनी म्हटलं की, “अखिलेश यादव यांचे वडील मुलायम सिंह यादव हे हनुमान भक्त होते आणि अखिलेश यांनी देखील एक भव्य मंदिर उभारलं आहे. ते भगवान श्रीकृष्णाच्या वंशातील असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
आपलं वक्तव्य पुढे नेताना सिंह म्हणाले, “अखिलेश यादव धर्मविरोधी असूच शकत नाहीत. ते जर काही धर्मविरोधात बोलत असतील, तर ती त्यांची केवळ राजकीय मजबुरी असावी. ही गोष्ट मला इथे सांगायची नव्हती, पण इथं विद्वान लोक आहेत, म्हणून माझ्या तोंडून ही खरी गोष्ट निघून गेली.”
या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना जोरदार उधाण आलं आहे. उत्तर प्रदेशातील भाजप आणि समाजवादी पक्ष यांच्यात धार्मिक मुद्द्यांवर नेहमीच टोकाचे मतभेद राहिले आहेत. अयोध्येतील राम मंदिर, धार्मिक स्थळे, वादग्रस्त वक्तव्ये आणि सण-उत्सवांचे राजकारण या साऱ्यांवर दोन्ही पक्षांमध्ये सतत आरोप-प्रत्यारोप सुरु असतात. अशा परिस्थितीत ब्रिजभूषण सिंह यांनी थेट अखिलेश यादव यांच्या समर्थनार्थ बोलणं म्हणजे त्यांच्या राजकीय पक्षांतराचे संकेत मानले जात आहेत.
ब्रिजभूषण सिंह हे काही नवखे राजकारणी नाहीत. उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात 1957 मध्ये जन्मलेले सिंह सहा वेळा खासदार राहिले आहेत. यापैकी पाच वेळा त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक जिंकली आहे, तर 2009 मध्ये त्यांनी समाजवादी पक्षाच्या तिकिटावरही विजय मिळवला होता. म्हणजेच त्यांचं सपा पक्षाशी पूर्वीपासूनच नातं राहिलेलं आहे.
परंतु गेल्या काही वर्षांत ब्रिजभूषण सिंह यांचे नाव सतत वादग्रस्त घटनांमध्ये गाजत राहिले आहे. 2023 मध्ये देशातील महिला कुस्तीपटूंनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर दिल्लीच्या जंतर-मंतरवर साक्षी मलिक आणि इतर नामांकित महिला कुस्तीपटूंनी आंदोलनही छेडलं होतं. या दबावामुळे ब्रिजभूषण यांना भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
या प्रकरणात दोन एफआयआर दाखल झाल्या होत्या. एका अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांनी ‘पॉक्सो’ कायद्याअंतर्गत तक्रार दिली होती, जरी ती नंतर मागे घेतली गेली असली तरी इतर महिलांनी दाखल केलेला खटला अद्याप न्यायालयात सुरू आहे. या वादामुळे भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला आणि त्यांच्या जागी मुलगा करण सिंह याला कैसरगंजमधून उमेदवारी दिली.
अशा पार्श्वभूमीवर ब्रिजभूषण सिंह यांचं भाजपपासून दूर जाणं आणि समाजवादी पक्षाच्या जवळ जाणं ही राजकीय गरज की वैचारिक बदल, यावर चर्चांचं वलय वाढत चाललं आहे. त्यांच्या अलीकडच्या वक्तव्यांनी या शक्यतेला अधिक बळकटी दिली आहे. आगामी काळात ते कोणता निर्णय घेतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.