लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने (Yogi Government) शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार मोठा निर्णय घेतला आहे. योगी सरकारने राज्यातील मुलांच्या स्कूल व्हॅनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य केले असल्याचे सांगण्यात येत आहे. परिवहन विभागाचे प्रधान सचिव एल. व्यंकटेश्वरलू यांनी हा आदेश जारी केला आहे.
जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, सीसीटीव्ही बसवण्यासाठी 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या आदेशाची वेळेत अंमलबजावणी होण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापनासह व्हॅन मालकांची असेल. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सीसीटीव्ही बसवल्याने मुलांची सुरक्षा वाढेल. याशिवाय स्कूल व्हॅनवरही लक्ष ठेवता येईल. लहान मुलांसोबत घडणाऱ्या अप्रिय घटनांनाही आळा बसणार आहे. हे सीसीटीव्ही खासगी स्कूल व्हॅन आणि शाळांच्या स्वतःच्या खासगी व्हॅनमध्ये बसवण्यात येणार आहेत.
नुकत्याच जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेसाठी आता सर्व शालेय वाहनांमध्ये सीसीटीव्ही लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा नियम मोटार वाहन नियमात आधीपासूनच आहे. काही शालेय वाहनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेही बसवले आहेत. मात्र, या अधिसूचनेनंतर राज्यातील सर्व स्कूल व्हॅनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मुदतही निश्चित करण्यात आली आहे.