Karni Sena Chief Sukhdev Singh Gogamedi Shot Dead
Karni Sena Chief Sukhdev Singh Gogamedi Shot Dead

  Karni Sena Latest News : राजस्थानमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्यावर मंगळवारी ( ५ नोव्हेंबर ) जयपूरमध्ये तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात सुखदेव सिंह गोगामेडी यांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात एका हल्लेखोराचाही मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

  जयपूरच्या श्यामनगर येथील गोगामेडी यांच्या घरी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. गोळी लागल्यानंतर गोगामेडी यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे डॉक्टरांनी गोगामेडी यांना मृत घोषित केलं आहे.
  गोगामेडींचा मित्र गोळीबारात गंभीर जखमी
  जयपूरचे पोलीस आयुक्त बिजू जॉर्ज जोसेफ यांनी म्हटलं, “तीन जणांनी गोगामेडींवर श्याम नगर येथील घरी गोळ्या घाडल्या. प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात एक हल्लेखोरही ठार झाला आहे. नवीन सिंह शेखावत असं ठार झालेल्या हल्लेखोराचं नाव आहे. गोगामेडींचा मित्र गोळीबारात गंभीर जखमी झाला आहे. तर, सुरक्षा कर्मचाऱ्याच्या पायात गोळी लागली आहे. दोन हल्लेखोर फरार झाले आहेत.”
  सीसीटीव्ही व्हिडीओत काय?
  या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. यात सुखदेव सिंह गोगामेडी सोफ्यावर बसलेले दिसत आहेत. त्यांच्यासमोर तीन लोक बसले आहेत. यावेळी अचानक दोघांनी उठून गोळ्या झाडल्या. हल्लेखोरांनी गोगामेडी यांच्याबरोबर मित्र आणि सुरक्षा रक्षकावरही गोळ्या झाडल्याच व्हिडीओत दिसत आहे.