Nagpur Airport:नागपूर विमानतळाचा कायापालट! देशातील सर्वात मोठे लॉजिस्टिक हब उभारणार; 'जीएमआर'ची ₹३२०० कोटींची योजना
Nagpur Airport : उपराजधानीचे भौगोलिक स्थान लक्षात घेऊन देशातील सर्वात मोठे लॉजिस्टिक हब आणि अत्याधुनिक सोयी-सुविधांसह जागतिक दर्जाचे विमानतळ विकसित करण्याची घोषणा जीएमआर एअरोचे कार्यकारी संचालक एस. जी. के. किशोर आणि नागपूर विमानतळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत भांडारकर यांनी बुधवारी एका संयुक्त पत्रकार परिषदेत केली.
मिहान इंडियाने २५ जून रोजी जीएमआर एअरोला विमानतळ हस्तांतरण केल्यानंतर कंपनीच्यावतीने आगामी तीन दशकांतील योजनांची माहिती देण्यात आली. गुजरात, ओरिसापासून मोठ्या प्रमाणात माल वाहतूक शक्य आहे. त्यासाठी कार्गो हबच्या दिशेने प्रयत्न करण्यात येतील. त्याचप्रमाणे आगामी ३० वर्षांत ३० लाखांवरून ३ कोटी प्रवासी वाढवण्याची योजना आहे. उर्वरित जमीन लक्षात घेता ‘टर्मिनल ३’ उभारून ५ कोटी प्रवासी हाताळण्याचे नियोजन आहे. प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असेही किशोर व भांडारकर यांनी सांगितले.
या प्रकल्पाचा मूळ प्रस्ताव सुमारे १६०० कोटी रुपयांचा होता. त्यास आता बरीच वर्षे झाली असल्याने ही किमत दुप्पट झाली असावी. त्यामुळे ३२०० कोटींची योजना असली तरी, विकास करताना येणारा खर्च बघून प्रकल्पाची किंमत ठरवण्यात येईल, असे सांगून एस. जी. के. किशोर यांनी प्रकल्पाची किंमत नेमकी किती हा मुद्दा फेटाळून लावला. विमानतळाच्या सर्वांगिण विकासासाठी विविध टप्पे राहतील, प्रवाशांच्या सोयींच्या दृष्टीने पहिल्या टप्प्यात सुमारे ३०० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
दक्षिणेकडे वायुसेना भारतीय वायुसेना नियमित: धावपट्टीचा वापर करेल. विमानतळाच्या दक्षिणकडे – एमआयएलकडून त्यांना जागा देण्यात येत आहे. त्यांना सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या जातील.
खऱ्या अर्थाने मध्य भारतात: हैदराबाद येथील विमानतळाचा विकास करताना आम्ही मध्य भारतातील केंद्र म्हणून प्रोजेक्ट केले. तथापि, आता खऱ्या अर्थाने देशाच्या हृदयस्थळी म्हणून मध्य भारताचे खरे स्थान आहे.
विद्यमान टर्मिनल तसेच एअरसाईड व लँडसाईड सोयींचे नूतनीकरण
अतिरिक्त चेक-इन काऊंटर्स व सेल्फ चेक-इन किऑस्क
अतिरिक्त एक्स-रे यंत्रांसह सुरक्षा तपासणी क्षेत्राची पुनर्रचना
हँड बॅगेज असणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन एक्सप्रेस सुरक्षा लेन
प्रवाशांच्या अधिक सुलभ प्रवेशासाठी विस्तारित फोरकोर्ट सुरक्षा लेन
देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी स्वतंत्र कार्ड लाऊंज
बस बोर्डिंग गेट्स चार करणार
प्रारंभी दरवर्षी ४० लाख प्रवासी क्षमता असलेले एकात्मिक प्रवासी टर्मिनल
अतिरिक्त कॉन्टॅक्ट व रिमोट एअरक्राफ्ट स्टँड्स
एकात्मिक प्रक्रिया क्षमतेसह नवीन कार्गो टर्मिनल (वार्षिक २० हजार मेट्रिक टन क्षमता)
इन-फ्लाईट किचन, भूमिगत इंधन हाताळणी प्रणाली
विस्तारित वाहनतळ व प्रवेश मार्गाचा विकास
व्यावसायिक तसेच सिटी साईड डेव्हलपमेंट उपक्रम
दुसऱ्या धावपट्टीचे बांधकाम
नवीन एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर व तांत्रिक इमारत
स्वतंत्र वीज व जलपुरवठा सोयी






