खंडणी मागणारे 'ते' पाच पोलिस अटकेत; फरार पोलिस नाईकाचा शोध सुरू (संग्रहित फोटो)
वडगाव मावळ / सतिश गाडे : मोटारीत अमली पदार्थ असल्याची भीती दाखवून कारवाई टाळण्यासाठी तब्बल पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोन पोलिस अंमलदारांसह तीन वाहतूक वॉर्डनना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील एक पोलिस नाईक (चालक) मात्र फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाली असून, संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या प्रकरणात एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
अशी घडली घटना…
फिर्यादी भूषित शर्मा हे ५ जुलै रोजी मित्रांसह मोटारीने पुण्याहून लोणावळ्याकडे जात होते. तळेगाव दाभाडे परिसरात त्यांची गाडी एका सरकारी वाहनाने अडवण्यात आली. वाहनातून उतरलेल्या आरोपींनी स्वतःला पोलिस असल्याचे सांगत त्यांच्या वाहनाची तपासणी सुरू केली. तपासणीदरम्यान त्यांनी “तुमच्या गाडीत अमली पदार्थ आहेत. तुमच्यावर गंभीर गुन्हा दाखल होईल,” अशी भीती दाखवली. त्यानंतर हे प्रकरण मिटवण्यासाठी पाच लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली. आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांवर दबाव टाकून एटीएममधून पैसे काढण्यास भाग पाडण्याचाही प्रयत्न केला.
प्रसंगावधानामुळे कट उधळला
आरोपी पैसे घेण्यासाठी फिर्यादीला तळेगाव दाभाडे परिसरातील एटीएमकडे घेऊन गेले. मात्र, संशय आल्याने फिर्यादीने अत्यंत चातुर्याने पिंपरी-चिंचवड पोलिसांशी संपर्क साधला. या माहितीची तात्काळ देवाणघेवाण पुणे ग्रामीण पोलिसांशी करण्यात आली.
माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना रंगेहाथ पकडले. तपासादरम्यान फिर्यादीच्या वाहनात कोणतेही अमली पदार्थ आढळून आले नाहीत. आरोपींनी केवळ खंडणी उकळण्यासाठी हा बनाव रचल्याचे स्पष्ट झाले.
अटक आरोपी कोण?
या प्रकरणात पोलिस अंमलदार अमोल ननावरे, तुषार दाबे, वाहतूक वॉर्डन किरण बोंबले, नितेश चव्हाण आणि तुषार झाडगे यांना अटक करण्यात आली आहे. तर खंडाळा महामार्ग पोलिस मदत केंद्रातील पोलिस नाईक (चालक) अमोल वायकर हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
निलंबनाचा प्रस्ताव
अटक करण्यात आलेल्यांपैकी तिघे जण खंडाळा महामार्ग सुरक्षा पथकात तर दोघे वाहतूक वॉर्डन म्हणून कार्यरत होते. या सर्वांविरुद्ध कठोर विभागीय कारवाई सुरू करण्यात आली असून, संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षकांचे स्पष्ट वक्तव्य
पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी सांगितले की, “पोलिस दलाची प्रतिमा मलीन करणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. कायद्याचा गैरवापर करून नागरिकांना धमकावणे किंवा खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.”






