अमरावती : तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू (N. Chandrababu Naidu) यांची मंगळवारी आंध्र प्रदेश विधानसभेत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतेपदी निवड करण्यात आली. त्यात आता चंद्राबाबू नायडू हे चौथ्यांदा आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेतेमंडळींची उपस्थिती असणार आहे.
विजयवाडा येथे तेलुगू देसम पार्टी, जनसेना आणि भाजपा आमदारांच्या बैठकीत आमदारांनी एकमताने नायडू यांची रालोआ नेते म्हणून निवड केली. जनसेना प्रमुख पवन कल्याण यांनी रालोआ नेते म्हणून चंद्राबाबू नायडू यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला, त्याला राज्य भाजपचे प्रमुख डी. पुरंदेश्वरी यांनीही पाठिंबा दिला. परिणामी, नायडू मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून उदयास आले.
नायडू सरकारचा आज शपथविधी सोहळा विजयवाडाच्या बाहेरील केसरपल्ली आयटी पार्कमध्ये सकाळी साडेअकराच्या सुमारास होणार आहे. राज्यपाल एस. अब्दुल नजीर हे नायडू यांना शपथ देतील. नायडूंसोबत तेदपाचे सरचिटणीस नायडू यांचा मुलगा नारा लोकेश आणि जनसेना नेते एन मनोहर शपथ घेतील. शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीसह मान्यवर उपस्थित राहतील.