गुजरातमध्ये विजयी झालेले आपचे आमदार नक्की कोण आहेत? वाचा सविस्तर
गुजरातच्या राजकारणात एक नवं पर्व सुरू करणाऱ्या विसावदर विधानसभा पोटनिवडणुकीत आम आदमी पार्टीचे नेते गोपाल इटालिया यांनी दमदार विजय मिळवला आहे. गोपाल इटालिया यांनी भाजपचे उमेदवार किरीट पटेल यांचा तब्बल १७,५५४ मतांनी पराभव करत ७५,९४२ मते मिळवली आहेत. हा विजय केवळ एका मतदारसंघापुरता मर्यादित नसून गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला नवसंजीवनी देणारा आणि पाटीदार समाजात पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध करणारा ठरला आहे.
गोपाल इटालिया हे पाटीदार समाजातील एक प्रखर आवाज असून, समाजात त्यांची ओळख एका बेधडक, स्पष्टवक्ते आणि झपाटलेले नेतृत्व म्हणून आहे. त्यांची सुरुवात एका सरकारी कर्मचाऱ्यापासून झाली होती – सुरुवातीस पोलिस खात्यात कॉन्स्टेबल, नंतर महसूल विभागात लिपिक. मात्र, व्यवस्थेतील अन्याय, भ्रष्टाचार आणि राजकीय दबावांमुळे त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि सामाजिक कार्यात सहभागी झाले.
त्यांनी हार्दिक पटेलसोबत पाटीदार आरक्षण आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली आणि या आंदोलनातूनच ते राज्यभर चर्चेत आले. पुढे आम आदमी पक्षाच्या माध्यमातून त्यांनी आपले राजकीय अस्तित्व निर्माण केलं. २०२२ मध्ये त्यांनी सूरतच्या काटारगाम मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्याचा पराभव झाला असला तरी त्यांची कार्यशैली आणि जमिनीवरची पकड लक्षात घेऊन पक्षाने त्यांना गुजरात युनिटचं अध्यक्षपद सोपवलं.
शैक्षणिक पार्श्वभूमी
इटालिया यांनी २०१६ मध्ये गुजरात विद्यापीठातून बी.ए. पदवी आणि २०२० मध्ये सौराष्ट्र विद्यापीठातून एलएल.बी. पर्यंत शिक्षण पूर्ण केलं आहे. सध्या ते कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. त्यांची एकूण संपत्ती सुमारे १० लाख रुपयांच्या आसपास असून कोणतेही कर्ज त्यांच्या नावावर नाही.
विसावदर मतदारसंघाची पार्श्वभूमी पाहता, ही पाटीदारबहुल आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील जागा आहे. येथे २०२२ मध्ये आम आदमी पक्षाचे भूपेंद्रभाई भायानी विजयी झाले होते. मात्र त्यांनी नंतर पक्षत्याग करून भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे स्थानिक जनतेमध्ये नाराजीची भावना होती. या पार्श्वभूमीवर गोपाल इटालिया यांनी गावोगाव फिरत प्रचाराचा धडाका लावला. त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, स्थानिक विकासाच्या मागण्या आणि भाजपच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना निवडणुकीच्या केंद्रस्थानी आणले. परिणामी, जनतेने त्यांच्यावर विश्वास टाकत स्पष्ट बहुमत दिले.
या विजयावर प्रतिक्रिया देताना गुजरात आपचे नेते अनुप शर्मा म्हणाले, “गोपाल इटालिया यांची ही एकट्याची नाही, तर संपूर्ण आम आदमी पक्षाची विजययात्रा आहे. भाजपच्या खोट्या आश्वासनांचा बुरखा आता फाटला आहे.”
गोपाल इटालिया यांचा हा विजय फक्त निवडणुकीतला एक यश नाही, तर गुजरातमध्ये राजकीय परिवर्तनाची शक्यता निर्माण करणारा निर्णायक क्षण आहे. त्यांनी केवळ विसावदर मतदारसंघातच नव्हे, तर राज्याच्या राजकारणात एक नवसंघर्ष आणि नवविश्वासाची दिशा दिली आहे.