नवी दिल्ली : सध्या देशात लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पाचव्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. त्यानंतर आज सहाव्या टप्प्यातील मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली आहे. भाजपने 400 पारचा नारा दिला असताना आता काँग्रेसने आपण एकट्यालाच बहुमत मिळणार असल्याचा दावा केला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी ‘काँग्रेस 273 पेक्षा जास्त जागा जिंकेल’, असा विश्वास व्यक्त केला.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खर्गे यांनी हा दावा केला. ते म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी जे काही बोलत आहेत ते खोटे आहे. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत त्यांनी अपेक्षित संख्याबळ गाठले. पण यावेळी त्यांना सत्तेत येणे अवघड आहे. भाजप दक्षिणेत आणि उत्तरेतही पराभूत होणार आहे. मी हे म्हणू शकतो कारण त्यांचे केरळ किंवा तामिळनाडूमध्ये अस्तित्व नाही, ते इकडे तिकडे एक किंवा दोन जागा जिंकू शकतात. आंध्र प्रदेशात त्यांचे अस्तित्व नाही. तेलंगणात आमचा वरचष्मा आहे’.
तसेच यापूर्वी आमच्याकडे फक्त दोन जागा होत्या, पण यावेळी आम्ही आमची संख्या 10 पर्यंत वाढवणार आहोत. कर्नाटकात आमची एक जागा होती, पण यावेळी आम्ही ती वाढवून 10 करणार आहोत. आपण जिथे हरलो तिथे जिंकलो आहोत. जिथे भाजपला एक किंवा शून्य जागा होत्या, तिथे ते जागा वाढवत नाहीत.
महाराष्ट्रात आम्हाला जागा मिळत आहेत. तुम्ही राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, पंजाब, हरयाणा येथे गेलात तरी आम्ही या राज्यांमध्ये चांगले काम करत आहोत. उत्तर प्रदेशमध्ये आम्हाला 10 जागा मिळतील आणि आमच्या आघाडीला 14 जागा मिळतील.
273 पेक्षा जास्त जागा जिंकणार
काँग्रेसच्या कामगिरीबाबत ते म्हणाले, ‘जास्त जागा जिंकण्याचा आमचा प्रयत्न आहे. लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी 273 जागांची गरज आहे, त्यापेक्षा जास्त जागा यावेळी मिळतील. आमची आघाडी 300 हून अधिक जागा जिंकेल. संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्ही ही युती म्हणून एकत्र आलो आहोत आणि आम्ही जिंकू’.