भारतातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 4054 वर, ठाण्यात JN.1 च्या पाच नव्या रुग्णांची नोंद!

कोरोनाच्या नवीन सब-व्हेरियंट JN.1 चे पहिले प्रकरण केरळमध्येच नोंदवले गेले होते. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रातील ठाण्यात कोरोनाच्या नवीन प्रकाराचे पाच रुग्ण आढळून आले आहेत.

    नवी दिल्ली : गेल्या काही दिवसापासुन देशात कोरोनाचे रुग्ण पुन्हा आढळण्यास सुरुवात झाली आहे. देशभरात कोरोना व्हायरस (Covid 19) बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात सक्रिय कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4054 वर पोहोचली आहे. एका दिवसापूर्वी 3742 सक्रिय प्रकरणे नोंदवली गेली होती. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या २४ तासांत केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर, ठाण्यात कोरोनाच्या नवीन उप-प्रकार JN.1 च्या पाच प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे.

    केरळमधे सर्वाधिक सक्रिय प्रकरणे

    आरोग्य मंत्रालयाने सकाळी 8 वाजता अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, केरळमध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत येथे 128 सक्रिय रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या तीन हजारांहून अधिक झाली आहे. एका नवीन रुग्णाचा मृत्यू झाल्याने देशभरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 5,33,334 वर पोहोचली आहे.

    नवीन प्रकार वेगाने पसरत आहे

    कोरोनाच्या नवीन सब-व्हेरियंट JN.1 चे पहिले प्रकरण केरळमध्येच नोंदवले गेले होते. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रातील ठाण्यात कोरोनाच्या नवीन प्रकाराचे पाच रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, नवीन  प्रकार वेगाने पसरत आहे, परंतु यामुळे रुग्ण गंभीरपणे आजारी पडत नाहीत. गेल्या 24 तासात 315 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यासह, आतापर्यंत देशभरात 4.44 कोटीहून अधिक लोक कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत.