Cyclone Montha : ओडिशात आज धडकेल मोंथा चक्रीवादळ; पश्चिम बंगालसह तमिळनाडूत मुसळधार पाऊस होणार (फोटो सौजन्य-X)
अमरावती : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यातच बंगालच्या उपसागरात उद्भवलेले चक्रीवादळ मंगळवारी सायंकाळी आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकले. मछलीपट्टनम आणि कलिंगपट्टनम दरम्यान काकीनाडा येथून जाताना 100 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत होते. यामुळे अनेक ठिकाणी घरे आणि झाडांची पडझड झाली. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती दिली जात आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, बुधवारी सकाळी मोंथा ओडिशात पोहोचण्याची शक्यता आहे. मोंथा तीव्र चक्रीवादळात रूपांतरित झाला. परिणामी, समुद्रात मोठ्या लाटा निर्माण झाल्या आणि आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागात जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरू राहिला. यामुळे किमान ५२ उड्डाणे रद्द करण्यात आली. दरम्यान, गेल्या 24 तासांत 120 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या वादळामुळे कोनासीमा जिल्ह्यातील मकानागुडेम गावात एका महिलेचा मृत्यू झाला. राज्यात ३८००० हेक्टरवरील उभी पिके आणि १.३८ लाख हेक्टरवरील बागायती पिके उद्ध्वस्त झाली आहेत. सुमारे ७६००० लोकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे.
हेदेखील वाचा : Cyclone Montha: ‘मोंथा’मुळे समुद्र भयानक खवळला; २४ तासांत कोकणात मुसळधार, किल्ल्याकडे जाणारी होडी…
मोंथामुळे ओडिशातील 15 जिल्ह्यांमध्ये सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळाचा सामना करण्यासाठी सज्ज असलेल्या ओडिशा सरकारने आधीच 800 मदत केंद्रे स्थापन केली आहेत. किनारी भागात एनडीआरएफ पथके देखील पूर्णपणे सज्ज आहेत. मोंथाच्या पार्श्वभूमीवर मदत आणि बचावकार्यासाठी 45 पथके तैनात करण्यात आली आहेत. यामध्ये आंध्र प्रदेशात १०, ओडिशात ६, तामिळनाडू आणि तेलंगणात प्रत्येकी ३, छत्तीसगडमध्ये २ आणि पुद्दुचेरीमध्ये १ पथकाचा समावेश आहे.
समुद्रकिनारी न जाण्याचा प्रशासनाचा सल्ला
लोकांना समुद्राजवळ जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे. चक्रीवादळग्रस्त भागातील रस्त्यांवरील वाहनांची वाहतूक बुधवार सकाळपर्यंत थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चक्रीवादळ मोंथाबाबत सरकारी यंत्रणा सज्ज
केंद्र सरकारने चक्रीवादळ मोंथाला तोंड देण्यासाठी तयारीचा आढावा घेतला आहे, आरोग्य मंत्रालयाने आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तामिळनाडूच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपत्कालीन वैद्यकीय सहाय्य उपायांवर चर्चा केली आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित वैद्यकीय सेवेसाठी राज्यांना आवश्यक ती सर्व मदत पुरवली जाईल, असे मंत्रालयाने म्हटले आहे.






