KBC मध्ये एक कोटी जिंकलेल्या डेप्युटी कमांडंटला मोठा झटका; गुजरातहून जम्मूच्या बांदीपोरात बदली
नवी दिल्ली : ‘कौन बनेगा करोडपती’ अर्थात केबीसी हा शो प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. या शोमधून जिंकून अनेक लोक लखपती-करोडपती होत आहेत. पण, अशाच प्रकारे करोडपती झालेल्या आदित्य कुमार यांना मात्र याचा फटका बसल्याचे सांगण्यात आले आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) डेप्युटी कमांडंट असलेले आदित्य कुमार यांची गुजरातहून बांदीपोरा येथे बदली करण्यात आली.
आदित्य कुमार यांनी ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC) च्या 17 व्या सीझनमध्ये भाग घेतला होता. यामध्ये त्यांनी ‘KBC’ मध्ये एक कोटी रुपये जिंकले. KBC मध्ये सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी आदित्य कुमार यांना मिठी मारली होती. त्यानंतर डेप्युटी कमांडंट कुमार आणि त्यांचे सहकारी आणि सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. मात्र, 29 ऑगस्ट रोजी अचानक CISF मुख्यालयाने आदित्य कुमार यांची गुजरातमधील UTPS उकाई येथून जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा येथे बदली केली.
दरम्यान, CISF च्या सर्वोच्च अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, हा बदली आदेश जारी करण्यात आला आहे. या बदलीचे कारण CISF ने आदेशात ‘प्रशासकीय कारण’ असे म्हटले आहे. त्यानंतर ही बदली केली गेली. या बदलीनंतर एकच चर्चा सुरु झाली आहे.
बदलीची चर्चा सुरु
डेप्युटी कमांडंट आदित्य कुमार यांच्या या बदलीची चर्चा केवळ CISF मध्येच नाही तर इतर केंद्रीय निमलष्करी दलांमध्येही होत आहे. तरुण कॅडरच्या अधिकाऱ्यांनी या बदलीवर आश्चर्य व्यक्त केले आहे. या कामगिरीबद्दल आदित्य कुमार यांना सीआयएसएफच्या वरिष्ठ नेतृत्वाने सन्मानित करायला हवे होते, असे कॅडर अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
वेळेपूर्वीच करण्यात आली बदली
आदित्य कुमार यांच्या नियमित बदलीचा कालावधी आलेला नाही. तरीही त्यांची बदली करण्यात आली. अनेक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, सीआयएसएफचे वरिष्ठ नेतृत्व त्यांच्या एका डेप्युटी कमांडंटने केबीसीमध्ये भाग घेतल्याने आणि त्यामध्ये एक कोटी रुपये जिंकल्याने आनंदी नसल्याचे दिसत आहे.