फोटो - सोशल मीडिया
दिल्ली : सध्या लोकसभेमध्ये पावसाळी अधिवेशन सुरु आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचे पूर्ण बजेट सादर केले. यामध्ये आंध्रप्रदेश व बिहार या राज्यांना सरकाराने मुक्त हस्ताने निधी दिला. मात्र इतर राज्यांना निधी दिला नाही अशी नाराजी विरोधकांनी व्यक्त केली. पश्चिम बंगालसाठी खास उपाययोजना न केल्याबद्दल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जोरदार टीका केली. यानंतर आता विरोधीपक्षाची भूमिका बजावत असलेल्या इंडिया आघाडीने नीति आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या बैठकीला ममता बॅनर्जी हजेरी लावणार आहेत.
विरोधीपक्षामध्ये पुन्हा एकदा फूट पडलेली दिसून येत आहे. इंडिया आघाडीने नीति आयोगावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या शनिवारी होणार असलेल्या या बैठकीला विरोधीपक्षातील नेते उपस्थित राहणार नाहीत. त्याचबरोबर विरोधीपक्षाचे शासन असलेले राज्यांचे मुख्यमंत्र्यांनी देखील या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. यामध्ये पंजाब, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेश यांचा समावेश आहे. मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मात्र या बैठकीला जाणार आहेत. त्या आपल्या निर्णयावर ठाम देखील आहेत. ममता बॅनर्जी यांच्यासोबत झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन देखील नीति आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहतील असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकत्त्यामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बैठकीला जाण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले. ममता बॅनर्जी म्हणाल्या, “मी आधीच ठरवले आहे की मी नीती आयोगाच्या बैठकीला जाणार आहे. पण त्यांची केंद्राची वृत्ती वेगळी आहे. बंगाल राज्याला देशाच्या अर्थसंकल्पापासून कसे वंचित ठेवण्यात आले आहे, हे सांगण्यासाठी त्यांनी आम्हाला पत्र लिहायला सांगितले आहे. मात्र आम्हाला हे मान्य नाही. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात भेदभाव केला आहे. म्हणूनच मी माझा आवाज उठवण्यासाठी नीती आयोगाच्या बैठकीत जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि काही वेळ बैठकीमध्ये असणार आहे. यावेळी त्यांनी आम्हाला काही बोलण्याची संधी दिली तर आम्ही आमचे मत मांडू. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेनही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये आम्ही आमच्या चिंता व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार आहोत. केंद्र सरकारने राजकीय आणि आर्थिक नाकेबंदी केली आहे. भाजपला जनता आणि बंगालमध्ये फूट पाडायची आहे,” असा घणाघाती आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे.