हैदराबाद : तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपाने (Turkey Syria Earthquake) जगभरातील लोकांना हादरवून सोडले आहे. या भूकंपात हजारो लोकांचा मृत्यू झाला. पण तुर्कीसारखा भूकंप भारतातही येणार असल्याचा अंदाज आता शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. ‘नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट’च्या (NGRI) शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.
‘एनजीआरआय’च्या शास्त्रज्ञांनी तुर्कीसारखा भूकंप भारतातही येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. सेस्मॉलॉजीचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. पूर्णचंद्र राव यांनी उत्तराखंडमध्ये तुर्कीसारखाच भूकंप येणार असल्याचा इशारा दिला आहे. पण हा भूकंप कधी येईल याची तारीख आणि वेळेबाबत सांगू शकत नाही. मात्र, उत्तराखंडच्या खाली मोठ्या प्रमाणावर दाब तयार होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. हा दबाव जेव्हा सुटेल तेव्हा भूकंप येईल हे नक्की. भूकंपाची तीव्रता ही भौगोलिक क्षेत्रावर अवलंबून असेल, असेही त्यांनी सांगितले.
VGDP पद्धत विश्वसनीय
पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली काय घडत आहे याचा तपास करण्यासाठी ‘व्हेरिओमेट्रिक जीपीएस डेटा प्रोसेसिंग’ पद्धत ही विश्वसनीय आहे. त्यानुसारच आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत. आम्ही अचूक वेळ आणि तारीख सांगू शकत नाही. परंतु उत्तराखंडमध्ये कधीही मोठा भूकंप होईल, असेही त्यांनी सांगितले.
रिअल टाईम स्थितीचे निरीक्षण
उत्तराखंडवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आम्ही हिमालयीन प्रदेशात सुमारे 80 भूकंप स्थानके निर्माण केली आहेत. आम्ही रिअल टाइम स्थितीचे निरीक्षण करू शकतो. आमच्या डेटानुसार हा दबाव बऱ्याच काळापासून निर्माण होत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.