Robert Vadra यांच्या अडचणीत वाढ; ED च्या आरोपपत्रात धक्कादायक खुलासे
काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ED ने दाखल केलेल्या आरोपपत्रात त्यांच्याबद्दल धक्कादायक खुलासे झाले आहेत. शिकोहपूर जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने काही महत्वाच्या गोष्टी नमूद केल्या आहेत.
१ सप्टेंबर २०१८ रोजी हरियाणा पोलिसांनी गुरुग्रामच्या खेडकी दौला पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला. या प्रकरणात रॉबर्ट वाड्रा, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंग हुड्डा, डीएलएफ कंपनी, ओंकारेश्वर प्रॉपर्टीज प्रा. लि. आणि इतरांवर फसवणूक, कटकारस्थान व भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले होते.
स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. (SLHPL) या कमी भांडवल असलेल्या कंपनीने 3.5 एकर जमीन केवळ ₹7.50 कोटींना विकत घेतली, जिची खरी बाजारभावानुसार किंमत ₹15 कोटी होती. विक्री करारपत्रात चुकीची नोंद करण्यात आली होती की पेमेंट चेकद्वारे झाले, मात्र तो चेक कधीच क्लिअर झाला नाही. तसेच सुमारे ₹45 लाखांच्या स्टॅम्प ड्युटीपासून बचाव करण्यासाठीही खोटी माहिती देण्यात आली.
आरोपांनुसार, रॉबर्ट वाड्रा यांच्या प्रभावाच्या मोबदल्यात ओंकारेश्वर प्रॉपर्टीजला तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडून गृहनिर्माण परवाना (हाउसिंग लायसन्स) मिळवून देण्यासाठी ही जमीन हस्तांतरित करण्यात आली. नंतर या जमिनीला व्यावसायिक परवाना (कॉमर्शियल लायसन्स) मिळवून, दबाव व फाइलमध्ये फेरफार करून तो जारी करण्यात आला आणि अखेरीस ही जमीन ₹58 कोटींना DLF कंपनीला विकण्यात आली.
ईडीच्या मते, या व्यवहारातून रॉबर्ट वाड्रा यांनी एकूण ₹58 कोटींची बेकायदेशीर कमाई केली. त्यापैकी ₹5 कोटी ब्लू ब्रीझ ट्रेडिंग प्रा. लि. (BBTPL) आणि ₹53 कोटी स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. मार्फत मिळाले. हा निधी मालमत्ता खरेदी, गुंतवणूक आणि त्यांच्या कंपन्यांची कर्जफेड यासाठी वापरण्यात आला.
ईडीने या प्रकरणात PMLA अंतर्गत अनेक कलमे तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम 423 चा समावेश केला आहे. आरोप सिद्ध झाल्यास 3 ते 7 वर्षांची शिक्षा होऊ शकते आणि बेकायदेशीर मालमत्ता जप्त केली जाऊ शकते. आतापर्यंत ईडीने ₹38.69 कोटी किमतीच्या 43 स्थावर मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्या आहेत, ज्यात बिकानेर, गुरुग्राम, मोहाली, अहमदाबाद, नोएडा आणि फरिदाबाद येथील जमिनी, फ्लॅट्स आणि व्यावसायिक युनिट्सचा समावेश आहे.