काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या मतचोरीच्या आरोपांनानंतर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राहुल गांधींच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाने राहुल गांधींना नियमांनुसार स्पष्ट घोषणापत्र आणि शपथपत्र सादर करावे किंवा त्यांच्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या आरोपांसाठी सार्वजनिकरित्या देशाची माफी मागावी, असे आव्हान केलं आहे. त्याच वेळी, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्यांनीही त्यांच्या विरुद्ध मोहीम सुरू केली आहे. त्यावरून राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला थेट भिडण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी (१० ऑगस्ट २०२५) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करत मतचोरीवरून थेट जनतेलाच आवाहन केलं आहे. “मत चोरी हा ‘एक व्यक्ती, एक मत’ या मूलभूत लोकशाही तत्त्वावर हल्ला आहे. मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी स्वच्छ मतदार यादी आवश्यक आहे.” असं त्यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी म्हणाले की, “निवडणूक आयोगाकडे आमची मागणी स्पष्ट आहे, पारदर्शकता दाखवा आणि डिजिटल मतदार यादी सार्वजनिक करा, जेणेकरून जनता आणि राजकीय पक्ष स्वतः त्याचे ऑडिट करू शकतील. तुम्हीही आमच्यात सामील होऊन या मागणीला पाठिंबा देऊ शकता – http://votechori.in/ecdemand ला भेट द्या किंवा 9650003420 वर मिस्ड कॉल द्या. ही लढाई लोकशाहीच्या रक्षणासाठी आहे.” असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमुद केलं आहे. त्यांच्या या ट्विटमुळे राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाविरोधात कंबर कसल्याचे दिसून येत आहे.
राहुल गांधी यांनी अलिकडेच झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. निवडणूक आयोगाने ( Election Commission of India) यावर तीव्र आक्षेप व्यक्त करत म्हटले की, ‘राहुल गांधी यांनी आदित्य श्रीवास्तव यांच्या प्रकरणाचा उल्लेख केला होता, तर २०१८ मध्ये या प्रकरणात आधीच कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या मते, काँग्रेस नेत्याने केलेले आरोप तथ्यांवर आधारित नाहीत आणि आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. लोकशाही प्रक्रियेवर विश्वास ठेवण्यासाठी नेत्यांनी तथ्ये आणि पुराव्यांसह विधाने करावीत असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांनी “ही लढाई लोकशाहीच्या रक्षणासाठी आहे” असे आवाहन करताच, सोशल मीडियावर त्यांना नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या पोस्टखाली अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये समर्थनाचे प्रमाणपत्र शेअर केले आहे. प्रतीक पाटील यांनी लिहिले, “मी प्रतीक पाटील आहे, #VoteChori विरुद्ध. मी राहुल गांधींच्या निवडणूक आयोगाकडून डिजिटल मतदार यादीच्या मागणीला पाठिंबा देतो.”
मोहम्मद शादाब खान यांनीदेखील आपले प्रमाणपत्र शेअर करून लिहिले, “मी मोहम्मद शादाब खान आहे, #VoteChori विरुद्ध. मी राहुल गांधींच्या निवडणूक आयोगाकडून डिजिटल मतदार यादीच्या मागणीला पाठिंबा देतो.” तसेच, एका व्यक्तीने राहुल गांधींच्या पोस्टमध्ये दिलेल्या मोबाइल क्रमांकावर मिस कॉल देऊन आपला पाठिंबा नोंदवला आणि कमेंट बॉक्समधील स्क्रीनशॉट शेअर करत लिहिले, “मी तुम्हाला पाठिंबा देतो सर.”






