Photo Credit- Social Media
रांची : झारखंडमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीला अवघे काही आठवडे शिल्लक असताना भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे आणखी दोन माजी आमदार झारखंड मुक्ती मोर्चात सामील झाले आहेत. माजी आमदार लुईस मरांडी आणि कुणाल सारंगी ( 21 ऑक्टोबर)झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) मध्ये सामील झाले आहेत.
दोनच दिवसांपूर्वी भाजपचे माजी आमदार केदार हाजरा आणि AJSU पक्षाचे उमाकांत रजक JMM मध्ये सामील झाले होते. याआधी केदार हाजरा, उमाकांत रजक, गणेश महाली यांच्यासह अनेक नेते झारखंड मुक्ती मोर्चात सहभागी झाले आहेत. भाजपचे माजी प्रवक्ते आणि बहरगोराचे आमदार सारंगी यांनी आज झारखंड मुक्ती मोर्चाच प्रवेश केल्याची माहिती दिली.
हेही वाचा: मोठी बातमी! लॉरेन्स बिश्नोई महाराष्ट्रातून विधानसभा निवडणूक लढवणार? ‘या’ पक्षाकडून मिळाली ऑफर
भाजपचे माजी आमदार लुईस मरांडी यांनी 2014 मध्ये दुमका येथून मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा 5,262 मतांनी पराभव केला होता. तर हेमंत सोरेन यांनी 2019 मध्ये 13,188 मतांनी विजय मिळवला होता. मात्र, त्यांनी ही जागा सोडली आणि बारहाईत जागा राखली.
झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपने पहिल्या यादीत 66 उमेदवारांना तिकीट दिले आहे. यामध्ये बाबुलाल मरांडी आणि चंपाई सोरेन यांच्यासह अनेक बड्या चेहऱ्यांनाही तिकीट देण्यात आले आहे. दरम्यान, मित्रपक्ष AJSU नेही काल आपली पहिली यादी जाहीर केली. AJSU ने पहिल्या यादीत आठ उमेदवारांना तिकिटे दिली.
हेही वाचा: दुबईत पादचाऱ्यांवर ठोठवण्यात आला हजारोंचा दंड; नेमके कारण काय?
महाराष्ट्राबरोबरच झारखंडमध्येही विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यावेळी झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान 13 नोव्हेंबरला होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 20 नोव्हेंबरला होणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. दोन्ही राज्यांतील विधानसभा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.