मुलं अभ्यासात कच्ची निघाली, निर्दयी बापाने दोन्ही मुलांना बादलीत बुडवून मारलं अन् स्वत:ही...
आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यात एक दुःखद आणि काळीज चिरणारी घटना घडली आहे. मुलांची शाळेत खराब कामगिरी नव्हती. त्यामुळे एका बापाने त्यांच्या ६ आणि ७ वर्षांच्या दोन्ही मुलांची बादलीत बुडवून हत्या केली आहे. व्ही. चंद्र किशोर (३७) असं या निर्दयी बापाचं नाव असून तो ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये काम करत होता. त्यानंतर त्याने स्वत:चं आयुष्यही संपवलं आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्ही. चंद्र किशोर ओएनजीसीमध्ये काम करत होते. त्याला सात आणि सहा वर्षांची दोन मुलं होती. किशोरला मुलांच्या अभ्यासाची खूप काळजी होती. जर मुलांनी अभ्यासात चांगली कामगिरी केली नाही तर त्यांना नंतरच्या आयुष्यात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागेल, अशी भीती त्याला होती. या चिंतेने तो इतका व्याकूळ झाला की त्याने प्रथम आपल्या मुलांना मारले आणि नंतर स्वत:चं आयुष्यही संपवलं.
पोलिसांनी सांगितले की, किशोरने मुलांना पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवून मारले. यानंतर त्याने स्वतःला गळफास लावला. त्याची पत्नी राणीने पोलिसांना सांगितले की, तिला तिचा पती बेडरूममध्ये फाशीवर लटकलेला आढळला, तर दोन्ही मुलांचे मृतदेह बादलीत होते. हे पाहून राणीला धक्काच बसला. तिने लगेच पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले.
घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाइड नोटही सापडली आहे. या चिठ्ठीत किशोरने मुलांच्या शिक्षणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. पोलिसांनी सांगितले की, सुसाइड नोटची चौकशी सुरू आहे. फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली आणि पुरावे गोळा केले आहेत. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शांतता पसरली आहे. या घटनेने लोकांना धक्का बसला आहे. मुलांच्या शिक्षणाचा ताण कधीकधी पालकांवर येतो. ही घटना त्याचाच परिणाम आहे.