दिल्ली : लोकशाही उत्सव म्हणून लोकसभा निवडणुकीकडे पाहिले जाते. संविधानाचा सन्मान आणि नागरिकांचा अधिकार असलेल्या निवडणुकांचे वारे मागील दोन पासून देशभरामध्ये सुरु होते. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपल्या भारत देशाकडे पाहिले जाते. नरेंद्र मोदी यांनी बहुमताचा जादूई आकडा गाठत पुन्हा एकदा सरकार स्थापनेचा दावा केला. त्यानंतर आज राष्ट्रपती भवन येथे नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी राष्ट्रपती भवन तिरंगी रंगामध्ये न्हाऊन निघाले आहे.
नरेंद्र मोदी हे देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आलेला नसला तरी देखील एनडीएच्या घटक पक्षांच्या साथीने मोदी हे केंद्रात सत्ता स्थापन करणार आहे. दोन दिवसांपूर्वी एनडीए घटक पक्षांची संसदीय बैठक पार पडली. यामध्ये नेता म्हणून नरेंद्र मोदी यांची एकमताने निवड झाली. राजनाथ सिंह यांनी ठेवलेल्या प्रस्तावाला नीतीश कुमार व चंद्रबाबू नायडू यांच्या सह सर्व घटक पक्षांनी अनुमोदन दिले. यानंतर आता नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. त्याचबरोबर 63 खासदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यासाठी राष्ट्रपती भवनमध्ये होणाऱ्या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती भवन सजले आहे. याचे फोटो ‘पवन अपडेटस्’ या पेजने शेअर केले आहे. महाराष्ट्रामधून भाजप व शिंदे गटाच्या खासदारांना मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातून नितीन गडकरी, मुरलीधर मोहोळ, पीयूष गोयल, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव, रामदास आठवले यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. शपथविधी सोहळ्यासाधी शेजारील 9 देशाचे प्रमुख दिल्लीमध्ये दाखल झाले आहे. नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे देखील उपस्थित असणार आहेत.