झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन
Shibu Soren passes away: झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) चे संस्थापक, झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते शिबू सोरेन यांचे सोमवारी सकाळी निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. ते ८१ वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते आजारी होते आणि दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात उपचार सुरू होते. शिबू सोरेन यांना किडनीशी संबंधित समस्या होत्या. त्यांच्यावर नेफ्रोलॉजी विभागात उपचार सुरू होते. आज सकाळी ८:४८ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने झारखंडच्या राजकारणातील एक प्रमुख युग संपले आहे.
त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना झारखंडचे मुख्यमंत्री आणि त्यांचे पुत्र हेमंत सोरेन यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली. “गुरुजी आता आपल्यात राहिले नाहीत. त्यांनी झारखंडच्या अस्तित्वासाठी आणि आदिवासी समाजाच्या न्यायासाठी आयुष्यभर संघर्ष केला,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. शिबू सोरेन यांचे झारखंडच्या निर्माणात मोठे योगदान राहिले आहे. ते तीन वेळा झारखंडचे मुख्यमंत्री राहिले असून केंद्र सरकारमध्येही त्यांनी मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
Chandra Gochar: चंद्राने नक्षत्रामध्ये संक्रमण केल्याने या राशीच्या लोकांना सुवर्णकाळाची सुरुवात
शिबू सोरेन बऱ्याच काळापासून रुग्णालयात नियमित उपचार घेत होते. त्यांना २४ जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा हेमंत सोरेन म्हणाले होते, ‘त्यांना नुकतेच येथे दाखल करण्यात आले आहे. म्हणून आम्ही त्यांना भेटायला आलो आहोत. त्यांच्या आरोग्याच्या समस्या तपासल्या जात आहेत.’
शिबू सोरेन यांनी १९७७ मध्ये पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवली, परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला. नंतर १९८० मध्ये त्यांना पहिल्यांदाच दुमका संसदीय मतदारसंघातून यश मिळाले. त्यानंतर ते १९८९, १९९१ आणि १९९६ मध्ये दुमका लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. २००२ मध्ये ते राज्यसभेवर जाण्यात यशस्वी झाले. त्यानंतर २००४, २००९ आणि २०१४ मध्ये ते पुन्हा खासदार झाले. २०१९ च्या निवडणुकीत दुमका येथून निवडणूक हरल्यानंतर शिबू सोरेन तिसऱ्यांदा राज्यसभेवर निवडून आले.
Kothrud Police: या पोलिसांना म्हणावं तरी काय? कोथरूड पोलिसांकडून तीन तरूणींना रिमांड रूममध्ये मारहाण
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शीबू सोरेन यांचा राजकी प्रवास मोठा खडतर होता. झारखंडच्या राजकारणात आपली वेगळी छाप सोडणारे झारखंड मुक्ती मोर्चाचे (JMM) संस्थापक शीबू सोरेन यांनी एक प्रदीर्घ आणि संघर्षमय राजकीय वाटचाल केली. स्थानिक आदिवासींच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या नेत्यांपैकी ते एक होते. १९४४ मध्ये झारखंडमधील दुमका जिल्ह्यात जन्मलेल्या सोरेन यांनी आदिवासी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी लढा सुरू केला. १९७० च्या दशकात त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चा स्थापन करून वेगळ्या झारखंड राज्यासाठी आवाज उठवला. त्यांच्या नेतृत्वाखाली या मागणीने जोर धरला.
राजकारणात त्यांनी संसदेपासून ते मुख्यमंत्रीपदापर्यंत विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. ते तीन वेळा झारखंडचे मुख्यमंत्री झाले, तसेच केंद्र सरकारमध्ये कोळसा मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. त्यांच्या कार्यकाळात झारखंडमधील अनेक प्रश्नांना राष्ट्रीय व्यासपीठ मिळालं. त्यांच्या कारकीर्दीवर काही वादग्रस्त छाया आल्या, तरीही त्यांनी आपला राजकीय वारसा कायम राखला. त्यांच्या पश्चात आता त्यांचे पुत्र हेमंत सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत आणि पक्षाचे नेतृत्व करत आहेत. शीबू सोरेन यांचा राजकीय प्रवास म्हणजे आदिवासी अस्मितेचा, संघर्षाचा आणि नेतृत्वाचा प्रतीकात्मक इतिहास आहे.