कोथरूड पोलिसांकडून तीन तरूणींना रिमांड रूममध्ये मारहाण व विनयभंग
Pune News: राज्यात सातत्याने अशा काही घटना समोर येत आहे ज्यामुळे पोलिसांवर विश्वास ठेवायचा की नाही, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. अशीच एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार सुसंस्कृत आणि विद्येचे माहेरघर म्हणून मानल्या जाणाऱ्या पुण्यात घडला आहे. कोथरूड पोलिस ठाण्यात पोलिसांनी तीन दलित तरुणींना पाच तास रिमांड रूममध्ये ठेवून छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात संपाताची लाट उसळली आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील एका गुन्ह्याच्या तपासासाठी या मुलींना पुण्यातील कोथरूड पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. मात्र, येथे त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार झाल्याचा आरोप संबंधित मुलींनी केला आहे. पीडित तरुणींपैकी एका तरुणीने माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “ही केस मुळात छत्रपती संभाजीनगरमधील होती. मात्र, पोलिस आमच्या पुण्यातील घरी आले. कोणतीही नोटीस किंवा वॉरंट न देता ते घरात घुसले.आमच्या बाथरूम आणि बेडरूमचीही झडती घेतली. इतकंच नव्हे तर आमच्या इनरवेअरचीही तपासल्या.”
तसेच, पोलिसांनी जातीवाचक शेरेबाजी करत खाजगी आयुष्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये केली आणि आम्हाला मारहाणही केली. आम्ही जाब विचारल्यावर पोलिस म्हणाले, ‘पोलीस स्टेशनमध्ये चला, सगळं दाखवतो’, अशी धमकीही पोलिसांनी दिल्याचे पिडीत तरुणीने सांगितले. या प्रकरणामुळे दलित समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, संबंधित पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.
कोथरूड पोलिसांकडून शिवीगाळ आणि मारहाण झाल्याचा आरोप करणाऱ्या दलित तरुणी अखेर रविवार मध्यरात्री साडेतीन वाजता आंदोलन स्थळावरून माघारी परतल्या. मात्र, संबंधित पोलिसांविरोधात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे पीडित मुलींसह त्यांना पाठींबा देणाऱ्या नेत्यांमध्ये आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणी पीडित मुलींसोबत आमदार रोहित पवार यांनी पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा आणि अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्याशी चर्चा केली. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप, भारिप बहुजन महासंघाच्या नेत्या सुजात आंबेडकर आणि अन्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.चर्चा सुमारे दोन तास चालली, मात्र पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीला अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही.
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘हे’ ड्रिंक ठरेल प्रभावी, चरबीचे टायर होतील गायब
वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चेनंतरही ठोस कारवाई न झाल्यामुळे कार्यकर्ते आणि आंदोलकांमध्ये संतापाची भावना आहे. दरम्यान, पीडित मुलींनी पोलिसांकडून झालेल्या वागणुकीचा आक्रोश व्यक्त करत न्यायाच्या मागणीसाठी लढा सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. संबंधित पोलिसांविरोधात कारवाई झाली नाही, तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही कार्यकर्त्यांकडून देण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 23 वर्षीय विवाहित महिला आपल्या पतीकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून पुण्यात आली होती. या महिलेची स्थिती पाहून पुण्यातील तीन तरुणींनी तिची मदत केली. मात्र, याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमधील प्रकरणाच्या तपासासाठी या तिघींना कोणतीही पूर्वसूचना न देता कोथरूड पोलिसांनी ताब्यात घेतले.
पीडित मुलींचा आरोप आहे की, कोथरूड पोलिस ठाण्यात त्यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि लैंगिक अपमान करण्यात आला. विशेष म्हणजे, या प्रकारात सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील, संभाजीनगर पोलीस स्टेशनचे अमोल कामटे आणि महिला कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांच्यावर थेट मारहाणीचे आणि अपमानास्पद वर्तनाचे आरोप करण्यात आले आहेत.