अखेर धनखड यांना सरकारी बंगला (Photo Credit- Social Media)
नवी दिल्ली : जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना उपराष्ट्रपतींसाठी असणारा सरकारी बंगला रिकामा करावा लागला. त्यानंतर त्यांना नवीन बंगला कधी मिळेल याची चर्चा होती. मात्र, आता जगदीप धनखड यांच्यासाठी सरकारने लुटियन दिल्लीत एक टाईप-8 सरकारी बंगला शोधला आहे. आता त्या बंगल्यात धनखड यांचे वास्तव्य असणार आहे.
कोणताही पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती निवृत्त झाल्यानंतर किंवा त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर केंद्र सरकार त्यांना आयुष्यभर लुटियन बंगला परिसरात एक टाईप-8 बंगला देते. त्यांच्या मृत्यूनंतर, ही सेवा त्यांच्या पत्नी किंवा पतीला आयुष्यभर दिली जाते. सध्या सरकारी बंगला न मिळाल्यामुळे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड दिल्लीतील छतरपूर येथील अभय चौटाला यांच्या फार्म हाऊसमध्ये स्थलांतरित झाले आहेत. सरकारने त्यांना बंगला दिला नाही. जे पहिल्यांदाच घडत आहे. हेच कारण आहे की, ते खासगी निवासस्थानी गेले आहेत.
केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने सांगितले की, माजी उपराष्ट्रपतींनी सरकारी बंगल्याबाबत कोणतीही इच्छा व्यक्त केली नाही. धनखड यांच्या फार्म हाऊसवर जाण्याबाबत आयएनएलडी नेते चौटाला म्हणाले होते की, ‘धनखड हे त्यांचे मोठे भाऊ आहेत. ते त्यांच्या फार्म हाऊसमध्ये हवे तितके दिवस राहू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कटामुळे धनखड यांना उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा द्यावा लागला, असेही अभय चौटाला यांनी म्हटले होते.
प्रकृतीचे कारण देत दिला उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा
उपराष्ट्रपतिपदाचा जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जगदीप धनखड यांनी अचानकपणे राजीनामा दिला. आरोग्याचे कारण देत जगदीप धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केला. त्यांनी अचानकपणे पद सोडल्यामुळे विरोधकांनी जोरदार टीका केली. जगदीप धनखड यांनी आता उपराष्ट्रपतींचा अधिकृत बंगला सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
उपराष्ट्रपतिपदासाठी 9 सप्टेंबरला होणार मतदान
देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी 9 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. 21 ऑगस्ट ही नामांकनाची शेवटची तारीख होती. तर नामांकनांची छाननी 22 ऑगस्ट 2025 रोजी झाली. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख ही 25 ऑगस्ट 2025 होती. त्यानंतर आता प्रमुख लढत ही महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे सुदर्शन रेड्डी यांच्यात होणार आहे.