फोटो सौजन्य : सोशल मीडिया
नवी दिल्ली: ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी महागाईचा फटका बसला आहे. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. यामुळे आता एलपीजी सिलिंडर महाग मिळणार आहे. नवीन किमती १ ऑगस्टपासून म्हणजेच आजपासून लागू झाल्या आहेत. 19 किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही वाढ झाली आहे. कंपन्यांनी या एलपीजी सिलिंडरची किंमत 8.50 रुपयांनी वाढवली आहे. त्याचबरोबर 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
एलपीजी सिलिंडरच्या किमती कुठे वाढल्या?
दिल्ली ते मुंबई एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वेबसाइटनुसार, देशाची राजधानी दिल्लीत आता 19 किलोचा एलपीजी सिलिंडर 1652.50 रुपयांना उपलब्ध आहे. यापूर्वी ही किंमत 1646 रुपये होती. येथे भावात 6.50 रुपयांनी वाढ झाली आहे. हे सिलिंडर आता कोलकात्यात १७६४.५० रुपयांना उपलब्ध आहे. येथे भावात 8.50 रुपयांनी वाढ झाली आहे. या सिलेंडरची नवी किंमत मुंबईत 1605 रुपये आणि चेन्नईमध्ये 1817 रुपये झाली आहे. 19 किलो LPG गॅस सिलेंडरची जुनी किंमत कोलकात्यात 1756 रुपये, मुंबईत 1598 रुपये आणि चेन्नईमध्ये 1809.50 रुपये होती.
घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती बदलल्या नाहीत
विना सब्सिडीच्या 14.2 किलो एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. हा सिलिंडर दिल्लीत 803 रुपयांना मिळतो. कोलकातामध्ये या सिलिंडरची किंमत 829 रुपये आहे. हा सिलिंडर मुंबईत 802.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपयांना उपलब्ध आहे. केंद्र सरकारने महिला दिनी या गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली होती. त्यामुळे सिलिंडरच्या दरात 100 रुपयांची घसरण झाली होती. त्यांनतर एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नव्हता.