पणजी – गोवा निवडणुकीच्या विधानसभा मतदान उद्या होणार आहे. गोव्यात मतदानाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. १ हजार ७२२ मतदान केंद्रांवर सोमवारी मतदान होणार आहे. ११ लाख ६५ हजार मतदार यावेळी मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
गोवा निवडणुकीत ९ प्रादेशिक पक्ष आपले नशीब आजमावत आहेत. ४० जागांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी ३०१ उमेदवार रिंगणात आहेत. मतदानासाठी ईव्हीएम मशीन वाटप पूर्ण झाले आहे. यावेळी कोरोनाच्या पाश्वभूमीवर संपूर्ण सतर्कता बागळली गेली आहे. ईव्हीएम मशीनची तपासणी करून ती मतदान केंद्रावर पाठवण्यात आली आहे. कोरोनाबाधितांना या मतदानात मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. सायंकाळी ५ ते ६ या वेळेत पीईपी किट घालून कोरोना रुग्णांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
राज्यात ११ ठिकाणी अशा ग्रीन पोलिंग स्टेशनची निर्मिती केली आहे. यात पोलिंग स्टेशनवर मतदार आल्यानंतर खास त्यांच्यासाठी ग्रीन कार्पेट लावण्यात आला आहे. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर मतदानाच्या ठिकाणी सर्वच साधने ही पारंपरिक पद्धतीने सजवण्यात आली आहेत. यात शाईच्या पेनापासून बसायची खुर्चीदेखील गोवन पद्धतीने सजवण्यात आली आहे.