सुरत : “मोदी नावाचे सगळे चोर कसे” असं वक्तव्य राहुल गांधींनी ((Rahul Gandhi) 2019 मध्ये कर्नाटकमध्ये केलं होतं. दरम्यान, यावरुन सुरत कोर्टात सुनावणी पार पडली. मोदी (Modi) आडनाव प्रकरणात 23 मार्चला सुरतच्या कोर्टानं (Surat Court) राहुल गांधींना दोषी ठरवलं आणि दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. शिक्षा सुनावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्वही रद्द करण्यात आलं. या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी न्यायालयानं राहुल गांधींना 30 दिवसांची मुदत दिली होती. त्यानुसार, आज शिक्षा सुनावल्यानंतर तब्बल 11 दिवसांनी राहुल गांधी न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. दरम्यान, आज राहुल गांधींच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांवर व कार्यकर्त्यांवर गुजरात पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी अडवणूक करत चौकशी केली तर काही जणांना ताब्यात घेत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
गुजरात पोलिसांची वर्तणूक लोकशाहीची गळचेपी – बाळासाहेब थोरात
दरम्यान, राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ सुरत गुजरात येथे जात असलेल्या राज्यभरातील नेते व कार्यकर्त्यांना गुजरात पोलीस वेगवेगळ्या ठिकाणी अडवून ताब्यात घेत आहेत. त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे निषेधार्ह आहे. गुजरात पोलिसांची वर्तणूक लोकशाहीची गळचेपी करणारी आहे. असं माजी मंत्री व ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. राहुल गांधींसोबत सुरतमध्ये प्रियंका गांधी, अशोक गेहलोत (राजस्थान), भूपेश बघेल (छत्तीसगड) आणि सुखविंदर सिंह सुखू (हिमाचल प्रदेश) हे तीन राज्यांचे मुख्यमंत्री, नाना पटोले आदी नेते राहुल गांधी यांच्यासोबत न्यायालयात उपस्थित राहणार होते. पण काही नेत्यांना गुजरातमध्ये जाण्याआधीच गुजरात पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी अडवून त्यांना ताब्यात घेतले आहे.
काय आहे प्रकरण?
2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी कर्नाटकातील कोलारमध्ये मोदी आडनावाबाबत “मोदी नावाचे सगळे चोर कसे” असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण मोदी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर गुजरातमधील भाजप आमदारानं राहुल गांधींविरोधात सुरत कोर्टात मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्याच्या विरोधात, न्यायालयानं राहुल गांधींना दोषी ठरवत तब्बल 2 वर्षांनी शिक्षा सुनावली होती. तसेच ओबीसी समाजाचा राहुल गांधींनी अपमान केल्यामुळं समाजाचा भावना दुखावल्या आहेत, त्यामुळं राहुल गांधींनी माफी मागावी यासाठी ओबीसी समाजाने राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन केले आहे. यानंतर या शिक्षेविरोधात राहुल गांधी याचिका दाखल करणार आहेत.