देहरादून येथे पावसाचा हाहा:कार; सहस्रधारा येथे ढगफुटीमुळे इमारती, हॉटेल्सची पडझड, जनजीवन ठप्प...
सहस्रधारा : गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध राज्यांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यातच देहरादूनच्या सहस्रधारा परिसरात सोमवारी रात्री उशिरा ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या ठिकाणी पावसाचा मोठा फटका बसला आहे. अचानक आलेल्या या ढगफुटीमुळे मुख्य बाजारात ढिगारा पडल्याने दोन ते तीन मोठी हॉटेल्स आणि अनेक दुकानांचे नुकसान झाले आहे.
कार्डिगडमध्ये ढगफुटी झाल्यानंतर मुख्य बाजारात मोठ्या प्रमाणात ढिगारा साठला. यामुळे दोन ते तीन मोठी हॉटेल्सचे नुकसान झाले तर एका बाजारात बांधलेली सुमारे 7 ते 8 दुकाने कोसळली. सुमारे 100 लोक तिथे अडकले होते, ज्यांना ग्रामस्थांनी सुरक्षितपणे वाचवले आणि सुरक्षित ठिकाणी नेले. एक ते दोन लोक बेपत्ता असल्याचीही माहिती दिली जात आहे. मात्र, सध्या त्यांचा शोध सुरु असल्याची माहिती आहे. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास एसडीआरएफ आणि अग्निशमन दल घटनास्थळी रवाना झाले आहे. मात्र, वाटेत अधिक ढिगारा असल्याने पथक घटनास्थळी पोहोचू शकले नसल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे जेसीबी घटनास्थळी पोहोचले आहे आणि मार्ग मोकळा करण्यास सुरुवात केली आहे, असे सांगण्यात आले. दुसरीकडे, तामसा नदी परिसरातही भीषण परिस्थिती आहे. तापकेश्वर मंदिरातील शिवलिंगही बुडाले आहे. मंदिर परिसर रिकामा करण्यात आला आहे.
अनेक ठिकाणी मोठा ढिगारा
आयटी पार्कजवळही मोठ्या प्रमाणात ढिगारा आला आहे. यामुळे सोंग नदीची पाण्याची पातळी बरीच वाढली आहे. पोलिसांनी जवळपास राहणाऱ्या लोकांना सतर्क केले आहे. तसेच, नदीकाठच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले आहे. ही घटना रात्री एकच्या सुमारास घडली.
पोलिसांसह बचाव पथक घटनास्थळी
या ढगफुटीची माहिती मिळताच, मोठ्या संख्येने पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. यानंतर एनडीआरएफ आणि एसडीआरएफलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. आतापर्यंत कोणत्याही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
मसुरीमध्येही ढगफुटीचा मोठा फटका
मसुरीच्या झाडीपाणी येथे सोमवारी रात्री उशिरा झालेल्या मुसळधार पावसामुळे कामगारांच्या घरांवर ढिगारा आला. या घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला आणि एक गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले आणि जखमी मजुराला उपचारासाठी रुग्णालयात नेले.