संग्रहित फोटो
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून हवामानात बदल जाणवत आहे. कधी उन्ह तर कधी पाऊस असे सुरु आहे. त्यातच आता केरळमध्ये पावसाने हजेरी (Heavy Rain in Kerala) लावली असून, अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून विशेष खबरदारीदेखील घेतली जात आहे.
केरळमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. कोट्टायम, इडुकी, पाथानामथित्ता या जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’चा इशारा देण्यात आला आहे. तर थ्रिसूर, पलक्कड, मलप्पुरम, कोझीकोड, तिरुअनंतपुरम, कोल्लाम, अलप्पुझा आणि एर्नाकुलम या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’चा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारीचा इशारा दिला आहे.
दरम्यान, डोंगराळ भागात भूस्खलनाचा मोठा धोका असल्याने त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा मंडळे ही पर्यटकांना वेळोवेळी खबरदारीच्या सूचना देण्याचे काम करतील. पर्यटकांना डोंगराळ भागामध्ये रात्री फिरण्यास सक्तमनाई करण्यात आली आहे. केरळमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने आता देशातील अनेक भागांंमध्ये पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.






