देशातील अनेक राज्यांत पावसाचा तडाखा; सात राज्यांत अलर्ट जारी, उत्तराखंडमध्ये कोसळली दरड
देहरादून : देशातील अनेक राज्यांत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. त्यात उत्तराखंड, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. उत्तराखंडमधील धारचुलामध्ये मुसळधार पावसानंतर चीन सीमेला जोडणाऱ्या तवाघाट-लिपुलेख रस्त्यावर ऐलागड आणि कुलागडजवळ दरड कोसळली. त्यामुळे दारमा, चौदास आणि व्यास या तिन्ही खोऱ्यांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे.
सध्या हवामान विभागाने जम्मू-काश्मीरसह जवळच्या राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 2 सप्टेंबरपर्यंत पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेशसह सात राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. पुढील सात दिवस उत्तराखंड आणि पूर्व राजस्थानच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. धारचुलातील तवाघाट-लिपुलेखसह सोबला रस्ता डोंगर कोसळल्यामुळे बंद करण्यात आला आहे. ढिगारा आणि दरड सतत कोसळत असल्याने वाहतूक ठप्प आहे.
तवाघाट-सोबला रस्त्यावरील सुवा झुला पुलाजवळ दगड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. रस्ते खुले करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. खराब हवामानामुळे या कामात अडचणी येत आहेत. जम्मू-काश्मीरमधील हवामान खात्याने आता 2 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसासह भूस्खलनाचा धोका व्यक्त केला आहे. त्याचा सर्वाधिक परिणाम जम्मू विभागावर होईल. ऑरेंज अलर्टचा काश्मीर विभागावर परिणाम होणार नाही.
जुने भूस्खलन क्षेत्र पुन्हा सक्रिय
रामबन आणि रियासीमधील जुने भूस्खलन क्षेत्र पुन्हा सक्रिय झाले आहेत. या शेकडो वर्षे जुन्या भागात अतिवृष्टीमुळे परिस्थिती आणखी बिकट होत आहे. विशेषतः, नाशरी बोगद्यापासून पंथ्यालपर्यंतचा २०-३० किमीचा परिसर अतिशय संवेदनशील बनला आहे.
जम्मू-काश्मीरात ढगफुटी
देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यात जम्मू आणि काश्मीरमधील रामबन जिल्ह्यातील एका दुर्गम गावात ढगफुटीची घटना घडली. या नैसर्गिक आपत्तीत तीन जणांचा मृत्यू झाला असून, दोन जण अजूनही बेपत्ता आहेत. ही घटना रामबनच्या राजगड भागात घडली. या ठिकाणी अचानक मुसळधार पाऊस झाला आणि पाण्याचा जोरदार प्रवाह गावात शिरला.